शबनम न्यूज | प्रतिनिधी
शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांनी योग्य मित्रपरिवार निवडावा. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निरोगी शरीर व स्वस्थ मन आवश्यक आहे. करियर ची मोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी चारित्र्य व नेतृत्व गुण महत्वाचे आहेत, असे वडोदरा येथील केंद्रीय कर आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या साते, वडगाव मावळ पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची दीक्षारंभ सोहळ्याने सुरुवात झाली. मानकोसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी स्मार्ट केम टेक्नॉलॉजीचे माजी संचालक विजय कुमार पाटील, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी विभागीय संचालक डॉ. अमरेंद्र साहू, कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. अमित पाटील आदी उपस्थित होते.
स्मार्टकेम टेक्नॉलॉजीचे माजी असोसिएट उप संचालक विजयराव पाटील यांनी सांगितले की, भारतीय कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे परिवर्तन होत आहे. शेतीमध्ये ए. आय., मशीन लर्निंग, ड्रोन्स, मोबाईल ॲप यांचा वापर वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे अन्नसुरक्षेला भविष्यात सर्वोच्च दर्जा मिळेल. नव्या तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढत असल्याने भारताचा प्राथमिक क्षेत्र असलेल्या कृषी उद्योगातून भविष्यात देशाच्या जीडीपी मध्ये भर पडेल असे पाटील म्हणाले.
पारंपारिक वही खात्यांपासून आजच्या युगातील डिजिटल बँकिंग प्रणालीपर्यंत सविस्तर माहिती दिली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची वेगवान वाटचाल होत आहे. या नव्या वाटचालीत सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूकी बाबत सजग रहावे. प्राध्यापकांनी या स्मार्ट व तंत्रज्ञान युक्त अध्यापन पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे डॉ. अमरेंद्र साहू म्हणाले.
डॉ. अमित पाटील यांनी पीसीयू विद्यापीठ अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे, प्लेसमेंट, विद्यापीठातील अभ्यासपूर्ण वातावरण यांची माहिती दिली.
स्वागत डॉ. अमित पाटील, प्रास्ताविक डॉ. अंकुर श्रीवास्तव आभार डॉ. रामदास बिरादार यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.