महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला.
पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.