शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘आजादी का अमृत महोत्सव’आणि हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत पिंपळे सौदागर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत तिरंगा वाटप कार्यक्रम तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी १० पासून या उपक्रमात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत,परिसरातील सार्वजनिक ठिकाणी व चौकात तिरंगा फडकावून,देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला.
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले आणि म्हणाले की,”‘हर घर तिरंगा’ अभियान आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या उपक्रमातून देशभक्तीचा संदेश प्रत्येकाच्या मनात पोहोचविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रध्वज हा आपल्या स्वाभिमानाचा,एकतेचा आणि बलिदानाचा प्रतीक आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकणे म्हणजे फक्त उत्सव नसून आपल्या देशासाठी असलेली निष्ठा व प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. नागरिकांचा आज मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला अभिमान वाटतो आणि अशी देशभक्तीची भावना नेहमीच वृद्धिंगत होत राहावी हीच आमची अपेक्षा आहे. आजच्या या उपक्रमामध्ये लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, महिलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग पाहून माझा विश्वास आणखी दृढ झाला आहे की आपली पुढची पिढी देशभक्तीची परंपरा अधिक जोमाने पुढे नेईल.
यावेळी नागरिकांनी देशभक्तीच्या भावनेने तिरंगा स्विकारला आणि १५ ऑगस्ट रोजी आपल्या घरावर अभिमानाने फडकविण्याचा संकल्प केला.या उपक्रमाचे उद्दिष्ट प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून एकता आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करणे हे होते.
शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर नागरिकांना मार्गदर्शन करत तिरंग्यांचे वाटप केले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे परिसरात देशभक्तीचा उत्साह पसरवला.
यावेळी प्रमोदभाऊ चौधरी, संदिप काटे,सौ. अनिताताई काटे, संजय भिसे, अरुण चाबुकस्वार, वैशालीताई खाडेय, संदेश काटे पाटील, दिपक नागरगोजे, मनोज ब्राम्हणकर, सागर बिरारी तसेच परिसरातील महिला, तरुण,जेष्ठ नागरिक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.