spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण

पिंपरी दि. १५ ऑगस्ट २०२५ : भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ७८ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी उपस्थितांना आयुक्त शेखर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.

आयुक्त सिंह म्हणाले,’भारतीय स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा उत्सव आपण घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून आनंदाने साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या देशाच्या इतिहासाची सुवर्ण पाने आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. सर्वप्रथम मी सर्व शहरवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.’

‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिका कटिबद्ध आहे. स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ई-प्रशासन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांमुळे आपले शहर देशभरात वेगळा ठसा उमटवत आहे. आगामी काळात देशाच्या जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासामध्ये आपल्या शहराचे मोठे योगदान असेल, असा मला दृढ विश्वास आहे,’ असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास आमदार उमा खापरे, ,माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे,नामदेव ढाके, जितेंद्र ननावरे,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर,शहर अभियंता मकरंद निकम,मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले,सह आयुक्त मनोज लोणकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे, डाॅ.अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड,देवन्ना गट्टूवार,अनिल भालसाखळे,उप आयुक्त राजेश आगळे,अण्णा बोदडे, पंकज पाटील, प्रदीप ठेंगल,ममता शिंदे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागातील अधिकारी,आपदा मित्र प्रमुख संतोष शेलार आणि ३० आपदा सहकारी,विविध विभागांचे प्रमुख,सामाजिक कार्यकर्ते,कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दिवंगत स्वातंत्र्य सैनिक यांच्या वीरपत्नी यांचा गौरव..

आजच्या कार्यक्रमात आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वीरपत्नी,वीरनारींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यामध्ये दिवंगत स्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्ण मेहेंदळे यांच्या वीरपत्नी सुलोचना मेहेंदळे,दिवंगत दिगंबर ढवळे यांच्या वीरपत्नी भिमाबाई ढवळे,दिवंगत बाळकृष्ण पुराणिक यांचा मुलगा प्रफुल्ल पुराणिक यांचा समावेश होता.

 

विविध शौर्यपदक विजेते मनपा अधिकारी,कर्मचारी यांचाही गौरव….

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त देशसेवा करणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील आजी-माजी सैनिकांना देश सेवेबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यामध्ये नायक सुभेदार मनोजकुमार साहू, नायक सुबेदार झेंडे रायबा आणि नायक अमितकुमार सिंह, सुबेदार मेजर संदीप बहिवाल, ऑननरी कॅप्टन प्रमोद निकम, मेजर उदय जरांडे यांचा समावेश होता.

ऑपरेशन स्नो लेपर्ड (लेह-लडाख) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल कमेंडेशन कार्ड पदक प्राप्त नायब सुबेदार मनोजकुमार साहू, नायब सुभेदार झेंडे रायबा आणि नायब अमितकुमार सिंह यांना सन्मानित करण्यात आले.

तर सुभेदार मेजर संदीप बहिवाल यांना ऑपरेशन कारगिल मध्ये कमेंडेशन कार्ड मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ऑननरी कॅप्टन प्रमोद निकम यांनी ऑपरेशन कारगिल मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल कमेंडेशन कार्ड प्राप्त केले तर मेजर उदय जरांडे यांनी बार टू सेना मेडल (शौर्य पदक) २००५, सेना मेडल (शौर्य पदक) २००६, मेंशन इन डिस्पॅचेस (शौर्य पदक) २००५ आणि कमेंडेशन कार्ड २००६ असे अनेक सन्मान मिळवले आहेत. त्यांनी ऑपरेशन ऑर्किड (मणिपूर) मध्ये उल्लेखनीय सेवा बजावली. या सर्व शूरवीरांचा पिंपरी चिंचवड स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

युध्दामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा सत्कार..

१९९७ मध्ये झालेल्या ऑपरेशन राहिनो मध्ये शहीद झालेले सुभेदार जालिंदर पाटील यांच्या वीरपत्नी सुमन पाटील तर दिवंगत हवालदार राजेंद्र जगदाळे यांच्या वीरपत्नी ज्योती जगदाळे यांचाही आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

अवयवदान करणा-यांच्या कुटुंबियांचा गौरव…

आज देशभरात विविध कारणांनी शरीरातील अवयव गमवलेल्यांची संख्या मोठी आहे. मृत्यू नंतरही देहाचा उपयोग व्हावा, महाराष्ट्रातील अवयव दानाचे प्रमाण वाढावे व अवयव दानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “अवयव दान जीवन संजीवनी अभियान” राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील यासाठी शहरात सातत्याने जनजागृती करत आहे.

या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अवयव दान करून नवजीवन देणाऱ्या कुटुंबांचा सन्मान स्वातंत्र्यदिनानिमित्त सन्मान केला यामध्ये दिवंगत विनोद मुथा यांच्या पत्नी स्वाती विनोद मुथा, दिवंगत मंगेश आगळे यांच्या पत्नी वर्षा मंगेश आगळे, दिवंगत प्रसाद गोसावी यांचे नातेवाईक अविनाश गोसावी, दिवंगत बिना क्षीरसागर यांचे नातेवाईक प्रकाश पंढरीनाथ क्षीरसागर, दिवंगत सुनीता साळवी यांचे नातेवाईक मन्मय साळवी आणि दिवंगत सागर हदगल यांचे नातेवाईक सोमनाथ परशुराम हदगल या अवयव दात्यांच्या कुटुंबांचा गौरव करण्यात आला. महापालिकेने नागरिकांना अवयव दानाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे व या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

टाटा मोटर्सचे अग्निशमन व सुरक्षा प्रमुख चुडामण झांबरे यांचा गौरव

पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक व आपत्कालीन सेवा विभाग हा शहरातील नागरिकांच्या जीवित आणि संपत्तीचे रक्षण करणारा अत्यावश्यक सेवांचा आधारस्तंभ आहे. अग्निशमन दलाकडे वार्षिक १००० पेक्षा अधिक आगी व रेस्क्यू सूचना येतात. अशा घटनांमध्ये आग विझविण्याबरोबरच धुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे हे आव्हानात्मक कार्य दल पार पाडते. या कामगिरीत टाटा मोटर्स कंपनीचे अग्निशमन व सुरक्षा प्रमुख चुडामण मनोहर झांबरे यांनी १९९९ पासून २६ वर्षे अतुलनीय सहकार्य केले आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडताच, त्यांनी तत्काळ टाटा मोटर्सचे प्रशिक्षित कर्मचारी व अग्निशमन वाहने निशुल्क पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीसाठी घटनास्थळी पाठविली. तसेच, पाणीपुरवठा अबाधित राहावा म्हणून टाटा मोटर्सचे गेट नेहमी खुले ठेवण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन…

स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तकेंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ई.व्ही चार्जिंग स्टेशनचे उदघाटन….

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यांत्रिकी विभागाकडून उभारण्यात आलेल्या ई. व्ही. चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त सिंह यांना या ई.व्ही.स्टेशनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

“अंदाजपत्रकात नागरी सहभाग” उपक्रमाला सुरुवात

पिंपरी चिंचवड महापालिकेचा “अंदाजपत्रकात नागरी सहभाग” या उपक्रमाची सुरुवात आयुक्त शेखर सिंह यांच्या शहरात जनजागृती करण्यात येणा-या वाहनाचे उद्घाटन करून करण्यात आली. या उपक्रमात नागरिकांना सहभागी होऊन नवीन प्रकल्प, योजना आणि विविध कामे सुचविता येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी आयुक्त सिंह यांनी केले आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

* पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये नुकतेच केंद्र शासनाने देशातील सातव्या क्रमांकाचे तर राज्यातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आपल्या शहराला सेव्हन स्टार गारबेज फ्री सिटी रेटिंग (‘Seven Star Garbage Free City Rating’)आणि वायकर प्लस (Water Plus) प्रमाणपत्र मिळाले आहे. शहरवासीय आणि स्वच्छता दूतांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे,हे यश मिळवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

* शहरातील मालमत्तांचे आधुनिक पद्धतीने सर्वेक्षण करून त्यातूनही कर उत्पन्न वाढवण्याचे आम्ही नियोजन केले आहे. कर संकलन वाढीसाठी राबविलेल्या अशा विविध उपक्रमांची दखल घेऊन राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानामध्ये महापालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. विविध विभागांकडे येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून नागरी समस्यांचे योग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी ‘सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन’ प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या गरजा, तक्रारी आणि पायाभूत सुविधा यांची सांगड घालणे सहज शक्य होत आहे.

* पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य शासनाच्या १०० दिवस सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. ई- प्रशासनासोबत दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपण लक्ष केंद्रीत केले आहे. पेपरलेस कामकाजासह शहरवासीयांना सहज आणि सुलभ पद्धतीने दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका कटिबद्ध आहे.

* राज्यातील सर्वाधिक प्रसूती करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या श्रेणीमध्ये महापलिकेच्या आकुर्डी रुग्णालयाला राज्य शासनाचा महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तर आरोग्य वैद्यकीय अधिकारी (MOH Ranking) या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचा हा गौरव आहे.

* आपल्या शहरामध्ये विकास प्रकल्प राबवण्यासाठी निधी आवश्यक असतो. यासाठी नवनवीन आर्थिक स्त्रोत निर्माण करून निधी उभारल्यास महापालिकेच्या आर्थिक क्षमतेवर ताण येत नाही. म्हणून देशामध्ये प्रथमच पिंपरी चिंचवड महापालिकेने ग्रीन बाँडच्या माध्यमातून २०० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. यातून आपण पर्यावरणपूरक विकास प्रकल्प राबवणार आहोत.

* पिंपरी चिंचवड महापालिका प्रत्येक समाजघटकांसाठी उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असते. आपण दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग भवन सुरू करून त्याठिकाणी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशातील हे एकमेव दिव्यांग भवन आहे. याशिवाय सेव्हन वंडर्स पार्क अशा प्रकारच्या विविध उद्यानांची निर्मिती, अग्निशमन दलाचे सक्षमीकरण, नर्सिंग महाविद्यालयाची सुरुवात, महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम, रस्त्यांचा विकास अशा बाबी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

* महापालिकेने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शहरात आयोजन करून सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून मराठी भाषा संवर्धनासाठी देखील महापालिका कटिबद्ध आहे.

* सक्षमा, कौशल्यम सारखे विविध प्रकल्प राबवून युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. महिला सक्षमीकरणासह समाजातील सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी महापालिकेने निष्ठापूर्वक विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

* नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिसावे यासाठी अंदाजपत्रकात नागरी सहभाग हा उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी नागरिकांनी सुचवलेल्या ४९९ कामांचा समावेश आपण अर्थसंकल्पात केला आहे. यासाठी सुमारे १३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या वर्षी देखील हा उपक्रम राबवण्यात येत असून आजपासून त्याची सुरुवात केली जात असल्याची मी घोषणा करीत आहे. या उपक्रमात सहभागी होत नवीन प्रकल्प, योजना आणि विविध कामे सुचविण्याचे मी शहरवासीयांना आवाहन करीत आहे.

* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेला २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा प्रवासाचा टप्पा गाठत असताना शहराच्या प्रमुख गरजा विचारात घेऊन विकासाचा सर्व समावेशक कृती आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने व्हिजन @५० धोरण हाती घेतले आहे. यामध्ये शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ व्यक्तींना सहभागी करून त्यांच्या सूचना संकलित करण्यात येत आहेत. यातून निश्चितपणे शहराच्या भविष्यातील गरजांचा वेध घेऊन विकासाचा टप्पा आपल्या शहराला गाठता येईल असा मला विश्वास वाटतो.

* स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने विविध महत्त्वाच्या इमारती, उड्डाणपूल, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक ठिकाणी आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई….

विद्युत विभागाचे सहशहर अभियंता अनिल भालसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अ क्षेत्रीय कार्यालय, भक्ती शक्ती उड्डाणपूल निगडी, सेंट मदर तेरेसा उड्डाणपूल पिंपरी, मधुकर पवळे उड्डाणपूल निगडी, ब क्षेत्रीय कार्यालय, लंडन पूल चिंचवड, भिमसृष्टी आंबेडकर चौक, क क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी कोर्ट नेहरूनगर, ड क्षेत्रीय कार्यालय, इ क्षेत्रीय कार्यालय, कुस्ती केंद्र भोसरी, कबड्डी केंद्र भोसरी, लांडेवाडी कमान, मोशी अग्निशमन केंद्र, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, फ क्षेत्रीय कार्यालय, टाऊन हॉल चिखली, ग क्षेत्रीय कार्यालय, ह क्षेत्रीय कार्यालय, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले पूल सांगवी फाटा, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर, तसेच जलशुद्धीकरण केंद्र चिखली व निगडी, विद्युत मुख्य कार्यालय आणि नाशिक फाटा पूल या ठिकाणी तिरंगी रोषणाईने स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिकच वृध्दिंगत झाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!