शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी, दि. १५ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी अंमली पदार्थ विरोधी पथकातील मा. स्वप्नील शिवाजी चव्हाण(सहाय्यक पोलीस निरीक्षक),मा. संतोष पाटील (पोलीस निरीक्षक)व अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे मानसिक, शारीरिक व सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “Say No to Drugs, Yes to Life” हा संदेश देत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन लेफ्ट. प्रसाद बाठे(एनसीसी ए.एन.ओ.), श्री. गणेश भांगरे (एनएसएस कार्यक्रम अधिकारी), डॉ. सचिन चव्हाण (एनएसएस कार्यक्रम अधिकारी), डॉ. प्रतिमा कदम (एनएसएस कार्यक्रम अधिकारी), यांनी केले.
कार्यक्रमात महात्मा फुले महाविद्यालयातील NCC व NSS स्वयंसेवकांसह नवमहाराष्ट्र शाळा व कन्या शाळा यांचे विद्यार्थीही सहभागी झाले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून सर्वांनी एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली आणि अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ झाली. अंमली पदार्थविरोधी या विशेष जनजागृती उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीचा अंगीकार, सामाजिक भान आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याची प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्य दिनासारख्या ऐतिहासिक दिवशी झालेला हा उपक्रम समाजाच्या आरोग्यपूर्ण आणि सुव्यवस्थित भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे तिन्ही विद्याशाखा उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाला नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व कन्या विद्यालयाच्या प्राचार्या उपस्थित होते.