पिंपरी (दिनांक : १५ ऑगस्ट २०२५) ‘असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी प्रत्येक भारतीयाच्या स्वयंशिस्तीतून देशाला वैभव प्राप्त होईल!’ असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी क्रांतितीर्थ, क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी व्यक्त केले. ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुकुंद कुलकर्णी बोलत होते. विश्व हिंदू परिषद, पिंपरी – चिंचवड अध्यक्ष ॲड. ललित झुनझुनवाला, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सहकार्यवाह प्रा. डॉ. नीता मोहिते, विश्वस्त मधुसूदन जाधव, नितीन बारणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गट कार्यवाह हेमंत फुलपगार, तेजस्विनी ढोमसे, जनता सहकारी बँक व्यवस्थापक विनोद देशपांडे, निखिल परदेशी, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, मुख्याध्यापिका वर्षा जाधव, वासंती तिकोणे आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
मुकुंद कुलकर्णी पुढे म्हणाले की, ‘हिंदू समाज एकत्रित नाही म्हणून ब्रिटिशांनी हिंदुस्थानाची सत्ता काबीज केली. त्यामुळे १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. असंख्य ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशाला जगात सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान आवश्यक आहे!’ ॲड. सतिश गोरडे यांनी प्रास्ताविकातून ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत आणि ध्वजगीत सादर करून देशभक्तिपर घोषणा देत तिरंगा ध्वजाला अभिवादन करण्यात आले. अतुल आडे, समर्थ डोंगरे, विनोद डोरले, नितीश कलापुरे, हर्षदा धुमाळ, वृषाली सहाणे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुधाकर हांडे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.