spot_img
spot_img
spot_img

नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागातर्फे नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त जाधववाडी येथील सावतामाळी सभागृह येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात ५५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात आकुर्डी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने नागरिकांना वजन, उंची, बीएमआय (शरीर वस्तुमान निर्देशांक), रक्तदाब मोजणी, संपूर्ण रक्त तपासणी (सीबीसी), पीबीएस, अकस्मात रक्तातील साखर तपासणी (बीएसएल-आर), सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, नियमित लसीकरण, छातीचा एक्स-रे, थुंकी तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड नोंदणी यांसह विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, नाक-कान-घसा व फिजिशियन तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आणि सर्व प्रकारच्या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

शिबिरात वैद्यकीय विभागाच्या सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, आकुर्डी रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. हरिदास शेंडे, डॉ. बाळासाहेब होडगर व इतर अधिकारी उपस्थित होते. शिबिराचे यशस्वी नियोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) शाहीन खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाकडून यापुढील काळात नागरी आरोग्य पोषण दिन (यूएचएनडी) अंतर्गत नवीन आकुर्डी रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, सांगवी रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालय यांच्या तर्फे शहरातील विविध ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी शक्य तितक्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे उद्दिष्ट केवळ वैद्यकीय उपचार व सेवा देणे नाही, तर नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे देखील आहे. अशा मोफत आरोग्य शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तज्ज्ञ सेवा पोहोचतात आणि लवकर निदानामुळे उपचार अधिक प्रभावी होतात. आगामी काळात देखील अशा प्रकारचे आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घेत स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

महापालिका नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी नेहमी कटिबद्ध आहे. अशा शिबिरांद्वारे लोकांना त्यांच्या घरा जवळील परिसरात आरोग्य तपासण्या व उपचार सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध करून देणे, हे आमचे प्राधान्य आहे. आरोग्य तपासण्या आणि प्रतिबंधात्मक उपचारांमुळे गंभीर आजार टाळता येतात. त्यामुळे नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीस प्राधान्य द्यावे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!