शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेअंतर्गत देशभक्तीची भावना जागृती करणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज ‘भारत गौरव गाथा – देशप्रेमाच्या स्वरलहरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमालाही रसिक श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. अशा प्रकारचे देशभक्तीपर उपक्रम खऱ्या अर्थाने नागरिकांमधील एकता आणि देशाभिमान वाढवणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवान्वये केंद्र सरकारकडून सन २०२२ पासून ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यंदाही ही मोहीम २ ते १५ ऑगस्ट २०२५ या काळात आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेने या काळात लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे, देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याअंतर्गत आज भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत गौरव गाथा – देशप्रेमाच्या स्वरलहरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, अतुल पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या, ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेअंतर्गत महापालिकेने २ ऑगस्ट २०२५ पासून आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये शाळकरी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मोहिमेअंतर्गत आयोजित उपक्रम १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार असून या देशभक्तीच्या उत्सवाला असाच चांगला प्रतिसाद द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले. यावेळी त्यांनी ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी ‘भारत गौरव गाथा – देशप्रेमाच्या स्वरलहरी’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक उदय साटम व ज्योती साटम यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.