शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना लागू नव्हती ,यासंदर्भात त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) यामध्ये समावेश करणेबाबत आदेश निर्गत झालेले आहेत. त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या वतीने नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना उपक्रम योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी आरहण व वितरण अधिकारी म्हणून कामकाज करण्या-या अधिका-यांना आज मे. प्रोटीन प्रा.लि. (एनएसडीएल) यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले.
पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील सभागृहात नोंदणी झालेल्या अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कामकाजाचे प्राथमिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप,मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे,उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरूण सुपे,ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ.तृप्ती सागळे,डाॅ.ॠतुजा लोखंडे,डाॅ.सय्यद अलवी,मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील,माहिती तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, कार्यकारी अभियंता महेश कावळे, लेखाधिकारी दिपक गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी राजीव घुले, डी.डी.कांबळे,राजाराम सरगर,रवींद्र बोऱ्हाडे, उपलेखापाल सागर नेवाळे, मुख्य लिपिक शांत गाढवे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या प्रशिक्षणादरम्यान मे.प्रोटीन (एन.एस.डी.एल.) कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सुर्यकांत तरे यांनी सदर पेन्शन योजनेस पात्र अधिकारी, कर्मचारी यांची सभासद (Subscriber) म्हणून नोंदणी करणेत येणार असल्याचे सांगितले. त्याकामी विहीत केलेला नमुना (Subscriber Registration Form) कर्मचा-यांकडून विहीत मुदतीत भरुन घेण्यात येत असून त्यांना वैयक्तीक PRAN (Permanent Retirement Account Number) देणेची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. सदर कामकाजासाठी एनपीएसचे रेकॉर्ड किपींग एजन्सी म्हणून मे. प्रोटीन प्रा.लि. (एनएसडीएल) हे कामकाज पाहणार आहेत.
विविध विभागप्रमुखांच्या नियंत्रणाखाली कामकाज करणा-या आहरण व वितरण अधिकारी यांना प्रत्यक्ष काम करण्याचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले असून यापुढे देखील विभागातील संबंधित इतरही कर्मचाऱ्यांसमवेत सूक्ष्म पातळीवर पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रविण जैन यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूण सुपे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.