शबनम न्यूज | प्रतिनिधी
राजस्थान येथील श्री कल्पतरू संस्थानतर्फे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते, पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक शशिकांत कांबळे यांना ‘वृक्षमित्र राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जयपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रीकल्चर मॅनेजमेंट दुर्गापूरा येथे आयोजित सोहळ्यात राजस्थानचे नगरविकास राज्यमंत्री झाबरसिंह खर्रा यांच्या हस्ते शशिकांत कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रसंगी श्री कल्पतरू संस्थानचे संस्थापक व ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा, प्रसिद्ध उद्योजक धिरेंद्र मदान आदी उपस्थित होते.
शशिकांत कांबळे यांनी पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने पुण्यामध्ये पर्यावरण, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाटप, आंबेडकर जयंती नाचून नव्हे, तर वाचून साजरी करूया, नशामुक्ती अभियान असे अनेक उपक्रम त्यांनी घेतले आहेत. या वर्षात पाच लाख झाडे लावण्याचा व त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. पद्मा प्रतिष्ठानच्या वतीने तळेगाव येथील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या आवारात नुकतीच ५२०० झाडे लावण्यात आली आहेत.