spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा – डाॅ.निलम गोऱ्हे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतीकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून, मराठी साहित्य, नाटकं, गाणी अत्यंत विलोभनीय आहेत. त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रीयन जेवण सर्वांनाच आवडते, त्यामुळे मराठी माणसाशी, मराठीत बोलल्यास तो दोन घास अधिक प्रेमाने वाढतो, अशी कोटी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी अस्खलित इंग्रजी भाषेत केली आणि येथील स्वामी विवेकानंद सभामंडपात हजारो विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा एकच कडकडात झाला. डाॅ.गोऱ्हे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी, व्यासपीठावर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) वैज्ञानिक पद्मश्री डाॅ.नागराजन वेदाचलम, मालवीय राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नाॅलाॅजीचे (एमएमआयटी) संचालक प्रा.डाॅ.एन.पी.पाधी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र. कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., इस्कॉन पुणेचे प्रमुख राधेशाम, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डाॅ.पाधी यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाला एक दशक पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच, सध्या अंतराळात पाठवण्यात आलेल्या मायक्रो सॅटलाईट आयआयटी शिवाय इतर ठिकाणी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. भारतातील विद्यार्थ्यात प्रचंड प्रतिभा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतः विश्वास ठेवत सर्वस्व अर्पण केल्यास त्यांना कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळेल.

याप्रसंगी बिलींग विभागाचे प्रमुख, प्रा.प्रदीप प्रभू यांना विद्यापीठाच्या जडणघडणीतील बहुमुल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्यासह डाॅ.अतुल पाटील, डाॅ.राजशेखर राठोड, प्रा.तुषार चौरुशी, डाॅ.शालिनी गर्ग, संदीप जाधव, यशस्विनी पिसोलकर यांचाही पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
विश्वशांती प्रार्थना सुरुवात तर राष्ट्रगीताने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजेश एस., यांनी तर आभार डाॅ.पुजेरी यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा.श्रद्धा वाघटकर, प्रा.स्वप्निल शिरसाठ, डाॅ.अशोक घुगे यांनी केले.

एमआयटी एडीटी-२.० ला प्रारंभ
डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठाने एक दशक पूर्ण केले आहे. ‘नॅक’कडून ‘अ’ श्रेणी मिळाल्यानंतर आता एमआयटी एडीटी व्हिजन-२.० ची सुरुवात झाली आहे. आता जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविणे, एआयमध्ये नवोपक्रम, मुक्त आणि दूरस्थ शिक्षण (ओडीएल), देशात आणि देशाबाहेर कॅम्पस स्थापन करणे आदी प्रयत्न आपण करणार आहोत. त्यामुळे, भविष्यातही एमआयटी एडीटी विद्यापीठ यशाची नवनवीन शिखरे पादक्रांत करेल याचा मला विश्वास आहे.

मी कुठल्याही आयआयटीमध्ये घडलो नाही, फक्त मला गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची प्रचंड आवड होती. त्यामुळे, प्रतिभावान वैज्ञानिक केवळ, आयआयटीत घडतात असे नाही. विद्यार्थ्यांचा पाया पक्का असेल, त्याच्यात समस्यांचे उत्तर शोधण्याची सर्जनशीलता असेल तर एमआयटीसारख्या संस्थांमधूनही भविष्यात चांगले संशोधक घडतील.
– पद्मश्री डाॅ.नागराजन वेदाचलम,
वैज्ञानिक, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो)

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!