- काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व व कार्यकर्त्यांचा अभाव: हर्षवर्धन सपकाळ
- राज्यात भाजपा महायुतीचे लुटेरे सरकार; ४० टक्क्यांने वसुली सुरु: विजय वडेट्टीवार
- केंद्रात व राज्यात काँग्रेस व राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू: बाळासाहेब थोरात
शबनम न्यूज | प्रतिनिधी
काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजपा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रीमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतात. एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात पण ते नेतृत्व सक्षम नसून पोकळ आहे म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागत असून ही शोकांतिका आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार,विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यू बी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित असावा हा त्यामागचा उद्देश आहे. यात orientation, introduction, आणि interaction ही त्रिसुत्री असणार आहे. दोन दिवस वरिष्ठ नेते व विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवली जाईल व कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. निवडणुकीपुरते जागे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सर्व संपले असा काँग्रेसचा विचार नसून काँग्रेस हा नितंरत चालणारा व स्वराज्याच्या दिशेने कुच करणार पक्ष आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, आपल्या समोर आव्हाने खूप आहेत, काँग्रेसने सत्ता सर्वोच्च कधीच मानली नाही, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज घटकांना नजरेसमोर ठेवून काम केले पण भाजपा मात्र फक्त दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहे. सत्ता ही सामान्य माणसांसाठी असली पाहिजे. लोकांना जोडण्याचे काम करा, तुमची ओळख कामाने, कर्तृत्वाने निर्माण करा. घराघरात जा व लोकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करा. राज्यात भाजपा युतीचे लुटेरे सरकार आहे. भाजपाकडे प्रचंड सत्ता, ईडी व सीबीआय आहे. प्रचंड लुट सुरु असून ४० टक्क्यांचे कमिशन लाटले जात आहे .
ज्येष्ठ नेते व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आपण वारस आहोत. काँग्रेसला बलिदानाचा इतिहास आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. काँग्रेस पक्षाने कठीण काळ पाहिलेला आहे व पराभवही पाहिलेला आहे पण यातूनही काँग्रेस पक्षाने उभारी घेतली व पुन्हा विजय संपादन केला. राज्यातील सरकारचा कारभार भयानक आहे, विधान भवनात घुसुन मारहाण होते, कँटिनमध्ये आमदार मारामारी करतो तर कोण गोळीबार करतो, भ्रष्टाचार बोकाळला आहे. पण आपल्याला जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. बँकिंगचे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत. नाफेडमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे मुद्दे घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे. जनता आपल्याबरोबर आहे, त्यांची कामे करा व काँग्रेस विचाराचे, राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या सामुहिक प्रार्थनेने करण्यात आली, त्यानंतर झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होऊन सहा महिने झाले, या सहा महिन्यातील कार्य अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.