शबनम न्यूज | प्रतिनिधी
सामाजिक युवाकार्यकर्ते, कलोपासक, साहित्याचे अभ्यासक, वक्ते डॉ. सिद्धनाथ देविदास घायवट (जोशी) यांना संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असलेल्या गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य, कला आणि साहित्य आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ऑनररी डॉक्टरेट ही मानद पदवी प्रदान करून सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सन्मानित करण्यात आले. पत्रकार भवन, पुणे येथे संपन्न झालेल्या या पदवीप्रदान सोहळ्यात गांधी पीस फाउंडेशन, नेपाळचे अध्यक्ष डॉ. लाल बहादुर राणा, शास्त्रज्ञ डॉ. नेता जोशी, अभ्यास मंडळाचे डॉ. संदीप सांगळे तसेच सिनेअभिनेत्री आर्या घारे, टॅलेंटकट्टा डॉट कॉमचे डॉ. दीपक जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सदर यशाचे श्रेय हे आपले नसून आपल्या आईवडिलांचे व आप्तस्वकीयांचे असल्याचे डॉ. सिद्धनाथ देविदास घायवट (जोशी) यांनी पदवी स्वीकारताना नमूद केले.
डॉ. सिद्धनाथ देविदास घायवट (जोशी) यांनी त्यांच्या आजवरच्या प्रवासात सबंध भारतभरात वेगवेगळ्या विषयांवर सुमारे शंभर व्याख्यानांचे पुष्प गुंफलेले आहेत. त्यांना आतापर्यंत तेवीस जिल्हास्तरीय आणि एक्केचाळीस राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. त्याचबरोबर डॉ. घायवट (जोशी) यांना तीन वेळा राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उन्नती घडून घ्यावी यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेले आहे.