शबनम न्यूज | प्रतिनिधी
रावेत-किवळे येथील बीआरटी मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. काम पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या विलंबामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बीआरटी मार्ग सुरू झाल्यास पीएमपीएमएल बसेससाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल आणि कोंडीत लक्षणीय घट होईल, असा विश्वास संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापू कातळे यांनी व्यक्त केला आहे.
रावेत-किवळे रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. बीआरटीमधील काही वळणांमुळे रस्ता बदलणाऱ्या वाहनांमुळे कोंडी वाढते. मार्ग सुरू केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होईल, असे स्थानिक नागरिक सोमनाथ गुरव यांनी सांगितले.
कामाची गती वाढवून बीआरटी मार्ग तातडीने पूर्ण करावा आणि रावेत, किवळे येथून निगडी, भोसरी, तळवडे येथे अधिक बसेस चालवाव्यात, अशी मागणी संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापू कातळे यांनी केली महापालिका आणि पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे.