spot_img
spot_img
spot_img

भारतमातेचा जयजयकार करत ९ ऑगस्ट क्रांती दिन शहरात संपन्न….

पिंपरी दि.९ ऑगस्ट २०२५:- महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथे थोर क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, उप आयुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे,सहाय्यक आरोग्याधिकारी सुधीर वाघमारे,अंकुश झिटे,सामाजिक कार्यकर्ते आसाराम कसबे तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

चिंचवड गावातील दामोदर हरी चापेकर यांनी बाळकृष्ण आणि वासुदेव या बंधूसह पुण्यामध्ये औध येथील गणेशखिंडीत रॅन्ड या जुलमी इंग्रज अधिकार्‍याची हत्या केली आणि देशाच्या क्रांतीच्या इतिहासातील क्रांतीची मशाल अधिकच प्रज्वलीत केली. याबद्दल इंग्रजांनी चापेकर बंधूना आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या स्मरणार्थ चिंचवड येथे हुतात्मा चापेकर चौकात चापेकर बंधू तसेच त्यांचे सहकारी रानडे यांचे समूह स्मारक बांधण्यात आले आहे.

चिंचवड स्टेशन येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा आहे. आद्य क्रांतीगुरू वस्ताद साळवे हे दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, निशाणेबाजी यासारख्या युद्धकलेत निपुण होते.त्यांनी ” जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ” अशी क्रांतिकारी घोषणा त्यांनी केली होती शिवाय देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांच्या फौजा तयार केल्या होत्या.

तर दापोडी येथे शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांचा पुतळा आहे. “इन्कलाब जिंदाबाद ” अशा घोषणा देत शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले.त्यांच्या बलीदानामुळे देशातील स्वातंत्र्यसैनिकांना,देशभक्तांना प्रेरणा मिळाली तर हुतात्मा नारायण दाभाडे हे देखील देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाले.दापोडी येथील कार्यक्रमास शहीद नारायण दाभाडे यांचे नातू विजय दाभाडे हे देखील उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात पिंपरी-चिंचवड शहराचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आहे असे सांगून शहरातील तसेच देशातील शहीद, ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक तसेच वीर जवानांच्या प्रती उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!