शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिका निवडणूक ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पिंपरी-चिंचवड या महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केला. या आरखड्यानुसार अनुसूचित जातीसाठी (एससी) २०, अनुसूचित जमाती (एसटी) तीन, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) ३५ आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी ७० जागा राखीव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य निवडणूक आयाेगाने आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर २२ ऑगस्टला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, २२ ते २८ ऑगस्ट या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.
या आराखड्यामध्ये महिलांसाठी ६४ आणि पुरुषांसाठी ६४ जागा असणार आहेत. प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच तयार करण्यात आली असून वाढत्या लाेकसंख्येमुळे प्रभागांतील आरक्षणांमध्ये बदल होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.महापालिकेची निवडणूक २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. सन २०११ च्या १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येप्रमाणेच प्रभाग रचना तयार केली आहे. तळवडे-चिखली भागातून प्रभाग रचना सुरू करून सांगवी-दापाेडी अशा उतरत्या क्रमाने पूर्ण केली. या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा मंगळवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला सादर करण्यात आला.
एक प्रभाग ४९ हजार ते ५९ हजार मतदार संख्येचा असणार आहे. महापालिकेचे एकूण ३२ निवडणूक प्रभाग असणार आहेत. या प्रभागामधून १२८ नगरसेवकांना मतदार निवडून देतील. त्यातील ६४ जागांवर महिला नगरसेविका असतील. १२८ पैकी अनुसूचित जातीसाठी २० (महिलांसाठी दहा), अनुसूचित जमातीसाठी तीन (महिलांसाठी दोन), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३५ (महिलांसाठी १८) जागा राखीव आहेत. तर, सर्वसाधारणसाठी ७० (महिलांसाठी २३) जागा असणार आहेत.