spot_img
spot_img
spot_img

यंदाचा गणेशोत्सव लेजरमुक्त करा ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मागील वर्षी लेजरचा वापर झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे काही लोकांना आयुष्यभराचे अंधत्व आले आहे. लेजरमुळे डोळ्यांना झालेली इजा कधीही भरून येत नाही. त्यामुळे लेजर वापरू नये. मागील दोन वर्षांत गणेशोत्सव कालावधीत पारंपरिक वाद्यांचा वापर वाढला असून डीजे चा वापर कमी झाला आहे. ही आनंदाची बाब आहे. वृद्ध आणि लहान मुलांना डीजेचा सर्वाधिक त्रास होतो. तर पारंपरिक वाद्यांमुळे आपली संकृती जोपासली जाते. ती जोपासण्याचे काम शहरातील अनेक मंडळे करत आहात. यावर्षी देखील डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना चालना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले.

सार्वजनिक गणेशोत्सव 2024 चा श्री मोरया पुरस्कार प्रदान सोहळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्राधिकरण निगडी येथे पार पडली. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, विवेक पाटील, संदीप आटोळे, बापू बांगर, विशाल गायकवाड, श्वेता खेडकर, पोलीस अधिकारी, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळाला पोलिसांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, यासह मंडप मालक, मंडपाचा आकार याचीही माहिती द्यावी लागणार आहे. परवानगीसाठी मंडळांना धर्मादायक आयुक्तांचे नोंदणी प्रमाणपत्र, मागील वर्षीचे परवानगी पत्र, सार्वजनिक जागेवर असल्यास ना हरकत प्रमाणपत्र, जगा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, वीज जोडणीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

यावेळी गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी उत्तरे दिली. मिरवणूक मार्गात झाडे, विजेचे खांब, वाहने पार्क केली जातात, त्याबाबत काय उपाययोजना करणार असा प्रश्न उपस्थित केला. त्याबाबत आयुक्त शेखर सिंह म्हणाले, याबाबत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवून अडथळा ठरणारे विजेचे खांब, वायर काढणे, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पीओपी लवकर विरघळण्यासाठी कृत्रिम हौदात विशिष्ट केमिकल टाकून त्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.

शेखर सिंह म्हणाले, गणेशोत्सव मंडळांचा परवानगीसाठी जास्त वेळ जाणार नाही, याबाबत आम्ही काळजी घेतली आहे. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. जेवढ्या जागेची आणि अटींची परवानगी दिली आहे त्याचाच वापर करा. गणेशोत्सव कालावधीत घाटांवर स्वच्छता राखली जाईल. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. सारथीवर गणेश मंडळांची तक्रार आल्यास ती प्राथमिकतेने सोडवली जाईल.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी पर्यंत गणपतीचे कोणतेही पुरस्कार नव्हते. जे चांगले काम करणारे मंडळ आहेत, समाजाला दिशा दाखवण्याचे काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोरया पुरस्कारांची सुरुवात केली. यात मंडळे किती सहकार्य करतील याबाबत शंका होती. पण आता खात्री झाली आहे की सर्व मंडळे खूप चांगले काम करत आहेत. मागील दोन वर्षांत पारंपरिक वाद्यांचा वापर वाढला असून डीजे चा वापर कमी झाला आहे. ही आनंदाची बाब आहे. वृद्ध आणि लहान मुलांना डीजेचा त्रास होतो. तर पारंपरिक वाद्यांमुळे आपली संकृती जोपासली जाते. ती जोपासण्याचे काम आपण करत आहात. यावर्षी देखील डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना चालना द्यावी. मागील वर्षी लेजरचा वापर झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे काही लोकांना आयुष्यभराचे अंधत्व आले आहे. लेजरमुळे डोळ्यांना झालेली इजा कधीही भरून येत नाही. त्यामुळे लेजर वापरू नये. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पूर्णपणे आनंद साजरा करावा. गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक दृष्टीकोन जपता आला तर ती आनंदाची बाब ठरेल. मिरवणूक मार्गावर बेकायदेशीर पार्किंग होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. पोलीस स्टेशन स्तरावर देखील पोलिसांची बैठक होणार आहे. त्यात सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे. पुरस्कारांची संख्या वाढविण्याची मागणी केली जाते. त्याबाबत आम्ही विचार करत आहोत. आता 12 पुरस्कार असून पुढील वर्षी आदर्श मिरवणूक आणि आदर्श देखावा असे दोन पुरस्कार वाढवले जाणार आहेत. त्यात मंडळांनी सहभागी व्हावे आणि हा पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

प्रास्ताविक उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले. उपायुक्त श्वेता खेडकर यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!