spot_img
spot_img
spot_img

महिला बचत गटांच्या हस्तकलेस आणि खाद्यपदार्थांना मिळाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय व टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या ‘सक्षमा’ प्रकल्पाच्या अंतर्गत, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणारा एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

ई क्षेत्रीय कार्यालयात आयोजित या उपक्रमात महिला बचत गटांनी हस्तनिर्मित राख्या, आकर्षक कलाकृती, विविध प्रकारचे हस्तकला साहित्य आणि पारंपरिक चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, बाजारातील मागणी ओळखून या स्टॉल्सद्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.

उपक्रमात सहभागी सर्व महिला बचत गटांनी केवळ उत्पादने विकण्यासाठी नव्हे, तर स्वतःची कला, कौशल्य आणि उद्योजकीय क्षमता प्रदर्शित करण्याची संधी या माध्यमातून साधली. या स्टॉल्सला ई क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भेट दिली. नागरिकांनी या महिलांच्या कलेला प्रोत्साहन देत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. येथे जवळपास १६ हजार ६०० रुपयांची खरेदी झाली. ज्यामुळे महिलांच्या आत्मविश्वासात भर घातली गेली.

या यशस्वी उपक्रमामुळे महिलांच्या बचत गटांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत झाली. ‘सक्षमा’ प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना दिलेले प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते, जे यशस्वीरित्या साध्य झाले आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ई क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, समूह संघटिका जयश्री पवळे, समूह संघटक दत्तात्रेय गोयकर, इ प्रभाग झोनल कॉर्डिनेटर सुजाता परदेशी यांनी कष्ट घेतले.
 
या उपक्रमात सहभागी महिला बचत गट – 

  • महालक्ष्मी महिला बचत गट
  • वरद लक्ष्मी महिला बचत गट
  • आदिश्री महिला बचत गट
  • अंबज्ञ महिला बचत गट
  • गुरुकृपा महिला बचत गट
  • तुळजाभवानी महिला बचत गट
  • गृहलक्ष्मी महिला बचत गट
  • स्वावलंबी महिला बचत गट
  • सिलवान काउंट महिला बचत गट

    शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेचा मार्ग दाखवण्यासाठी सक्षमा प्रकल्पाची मोठी मदत होत आहे. या महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ई क्षेत्रीय कार्यालय कायम प्रयत्नशील आहे.
    – तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी, ई क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!