शबनम न्यूज | प्रतिनिधी
उच्च दूरदृष्टी, स्पष्ट ध्येय आणि वेगाने प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीमुळे पिंपरी चिंचवड विद्यापीठ वेगाने प्रगती करीत आहे.पीसीयू आणि यूजीसी करारामुळे फॅकल्टी डेव्हलपमेंट आणि बहुविषयक शिक्षणाला निश्चित चालना मिळेल असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे – एचआरडीसी संचालक डॉ. राजेश कुमार दुबे यांनी व्यक्त केला.तसेच विकासाचा टप्पा साध्य करण्यासाठी इतर विद्यापीठांना वीस वर्षे लागली तो टप्पा पीसीयू विद्यापीठाने अवघ्या दोन वर्षात गाठला आहे असे गौरवोद्गार डॉ. दुबे यांनी काढले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि (यूजीसी) मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र (एमएमटीसी), मानवी संसाधन विकास केंद्र (एचआरडीसी) यांच्या मध्ये सोमवारी (दि. ४) सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि यूजीसी – एचआरडीसी संचालक प्रा. डॉ. राजेश कुमार दुबे यांनी सह्या केल्या. या करारामुळे शैक्षणिक उत्कृष्टतेस प्रोत्साहन मिळेल, फॅकल्टी डेव्हलपमेंट वेगाने होईल आणि बहुविषयक शैक्षणिक सहकार्य घडून विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल.
यावेळी पीसीयूचे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र – कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे आदी उपस्थित होते.
डॉ. दुबे म्हणाले की, आजचे शिक्षक केवळ अध्यापन करणारे नसून राष्ट्रनिर्माते आणि समस्यांचे उपाय शोधणारे चिकित्सक संशोधक असले पाहिजेत. त्यांचामध्ये विशाल दृष्टीकोन आणि स्थानिक समस्यांवर उपाय शोधणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची क्षमता असली पाहिजे. तसेच त्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) संयुक्त पदवी व दुहेरी पदवी अभ्यासक्रम हे समजून घेऊन त्यासाठी काम करता आले पाहिजे. यासाठी पीसीयू आणि युजीसी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
आता यूजीसी – एचआरडीसी प्रायोजित राष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स पीसीयूमध्ये आयोजित केले जातील. या उपक्रमांद्वारे विविध शाखांतील प्राध्यापक एकत्र येऊन संवाद, सहअभ्यास, आणि नवीन अध्यापन पद्धतींवर चर्चा करतील. यामध्ये आंतरशाखीय अभ्यास व प्रशिक्षणाच्या नव्या दृष्टीकोनांवर विचारमंथन घडेल असे डॉ. दुबे यांनी सांगितले.
डॉ. गिरीश देसाई म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता, सर्व समावेशकता आणि सहकार्य ही आमच्या पीसीईटी आणि पीसीयूची मूल्ये आहेत. हा करार महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अधिक प्रभावीपणे राबविता येईल.
पीसीयू चे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात अधोरेखित करण्यात आलेली नवोपक्रमशीलता, विद्यार्थ्यांमधील उद्योजकता आणि विकसित भारत व ‘मेक इन इंडिया’ सारख्या उपक्रमांचे उद्दिष्ट या विद्यापीठाच्या धोरणात अंतर्भूत आहे असे सांगितले.
पीसीयूचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी पीसीयूच्या भविष्यातील योजना, संशोधन प्रकल्प आणि अभ्यासक्रम नवकल्पना याविषयी माहिती दिली.
पीसीयूचे कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनामुळे पीसीयू गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.