spot_img
spot_img
spot_img

भारत निवडणूक आयोगातर्फे १ लाखांहून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी (BLO) प्रशिक्षण सुरू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई  : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी नवी दिल्ली येथील भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (IIIDEM) येथे प्रथमच होणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे राज्य सरकारी कर्मचारी असतात, ज्यांची नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी (ERO) द्वारे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या (DEO) मंजुरीनंतर केली जाते. मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्यात मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्य सरकारांनी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून SDM स्तरावरील किंवा समकक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या अधिकाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यावर विचार करावा, असे सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 326 आणि लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 20 नुसार, 18 वर्षे पूर्ण झालेले आणि संबंधित मतदान केंद्राच्या क्षेत्राचे सामान्य रहिवासी असतील असे भारतीय नागरिक हे मतदार होऊ शकतात.

तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील मतदारयाद्यांचे अद्यतन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत.

याशिवाय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना सौजन्यशील आणि सभ्य वर्तन ठेवण्यास सांगितले.

येत्या काही वर्षांत अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे दर 10 मतदान केंद्रांसाठी एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या प्रमाणात एकूण 1 लाखाहून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना प्रशिक्षित केले जाईल. हे प्रशिक्षित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 100 कोटी मतदार आणि आयोग यांच्यातील प्रथम व सर्वांत महत्त्वाचा दुवा आहेत. विधानसभा मतदारसंघस्तरावरील मास्टर प्रशिक्षक (ALMT) यांचा गट तयार करून ते देशभरातील मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांचे नेटवर्क मजबूत करतील.

हा क्षमता बांधणीचा प्रशिक्षण कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरु राहील. प्रथम टप्प्यात निवडणूक होणाऱ्या राज्यांवर भर दिला जाईल. सध्या बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम येथील 109 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील 24 मतदार नोंदणी अधिकारी आणि 13 जिल्हा निवडणूक अधिकारी हे या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950, मतदार नोंदणी नियम 1960 आणि भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगणे आणि मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणे हा आहे. तसेच, या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना त्यांच्या कार्यासाठी उपयुक्त आयटी प्रणालींची माहिती दिली जाईल.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, भारतीय निवडणूक आयोग नेहमीच भारताच्या 100 कोटी मतदारांसोबत राहील, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!