शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहराच्या पर्यावरण क्षेत्रातील स्थितीचा सखोल मागोवा घेणारा “पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल सन २०२४-२५” चे आज पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते स्थायी समितीच्या बैठकीत प्रकाशन करण्यात आले.
या अहवालात मागील तीन वर्षांचा तुलनात्मक आढावा घेत शहरातील पर्यावरणविषयक स्थितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. क्षेत्र आणि लोकसंख्या, हवामानातील बदल, पर्जन्यमान, पाणीपुरवठा, नदी-नाले-तलावांची सद्यस्थिती, जलनि:स्सारण योजना व मैलाशुद्धीकरण प्रकल्प, हवेतील व ध्वनी प्रदूषणाचे स्तर, मृदा गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा वापर, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्याने, उद्योगधंदे, आपत्ती व्यवस्थापन, शहर नुतनीकरण योजना आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, पिंपरी चिंचवड शहराने जलनि:स्सारण व्यवस्थापनाच्या बाबतीत १०० टक्के निकष पूर्ण करत सलग दुसऱ्यांदा ‘वॉटर प्लस’ मानांकन प्राप्त केले आहे. यामध्ये घरपातळीवरील घनकचरा व्यवस्थापनातून सुक्या कचऱ्यापासून उभारलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, राडारोड्यावर प्रक्रिया करणारा सी अँड डी प्लांट, एमआरएफ युनिट्स, ओला-सुका कचरा ट्रान्स्फर स्टेशन, मोशीतील बायो मेडिकल वेस्ट प्लांट, कंपोस्टिंग युनिट्स, पुनर्वापर प्रकल्प, बायोगॅस युनिट्स आणि विकेंद्रित प्रक्रिया केंद्रे यांचे विशेष योगदान राहिले आहे. या सर्व कार्यवाहीमुळे शहराने सात-स्टार गार्बेज फ्री सिटीचे मानांकनही यशस्वीरित्या राखले आहे.
मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या अहवालासाठी कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, कार्यकारी अभियंता सोहन निकम, चीफ केमिस्ट उमा भोगे, कनिष्ठ अभियंता प्रतीक सूर्यवंशी आणि पर्यावरण विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पिंपरी चिंचवड शहराचा पर्यावरणीय विकास हे केवळ यंत्रणांचे यश नसून, प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून मिळालेले यश आहे. पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल हे शहराच्या पर्यावरणविषयक प्रगतीचा आरसाच आहे. भविष्यातील निर्णयांसाठी मार्गदर्शक म्हणून हा अहवाल महत्त्वपूर्ण ठरू शकेल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल म्हणजे केवळ माहितीचा दस्तऐवज नसून, तो शहराच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासासाठी दिशा दाखवणारा आराखडा ठरणार आहे. पर्यावरण जपण्यासाठी नागरिक, प्रशासन व सर्व घटकांनी एकत्र येत प्रयत्न सुरू ठेवल्यास पिंपरी चिंचवड देशात आदर्श ठरेल.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
पर्यावरण सद्यस्थिती अहवालामध्ये आम्ही केवळ आकडेवारी सादर केलेली नाही, तर शहराच्या पर्यावरणासंबंधीच्या प्रत्येक घटकाचे कार्यपद्धतीनुसार दस्तऐवजीकरण केले आहे. सातत्याने सुधारणा करणे आणि विज्ञानाधिष्ठित निर्णय घेणे हे आमचे उद्दिष्ट राहिले आहे. पिंपरी चिंचवडचा हा अहवाल इतर शहरांसाठीही दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
अहवालातील प्रमुख निष्कर्ष
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून विविध संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, नागरिक इत्यादींच्या सहभागाने विविध ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य नियमितपणे तसेच विविध अभियानांच्या माध्यमातून केले जाते. सन २०२४-२५ मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून एकूण १,७३,५७६ वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे हवामान साधारणपणे उष्ण कटीबंधाप्रमाणे आहे. सन २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी येथे सर्वात जास्त जुलै महिन्यात २१८.० मिमी इतका तर चिंचवडमध्ये १९७.५ मिमी इतका पाऊस नोंदवला गेला आहे.
सन २०२४-२५ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत ३६% वाढ झालेली दिसून येत आहे. शहरात नोंदणी होणाऱ्या एकूण वाहनांपैकी ३.५% ई-वाहनांचे प्रमाण दिसून येत आहे. सन २०२४-२५ पर्यंत साधारणपणे ५०,९०२ ई-वाहनांची नोंद झालेली आहे.
वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण तसेच बदलेले राहणीमान यामुळे हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. पीएम १० व पीएम २.५ धुलीकणांचे वार्षिक सरासरी प्रमाण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा जास्त नोंदविले गेले. मागील वर्षांतील जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) चांगला (Good) या श्रेणीत, तर एप्रिल, मे, ऑक्टोबर ३ महिन्यात समाधानकारक (Satisfactory) आणि नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात मध्यम प्रदूषित (Moderate) या श्रेणीत आढळून आले.
सन २०२४-२५ मध्ये पी एम पी एम एल च्या ताफ्यात स्वत:च्या मालकीच्या व भाडेतत्वाच्या एकूण १९४८ बसेस आहेत. जून २०२५ अखेर सीएनजी बसेसची संख्या २२५ इतकी तर इ-बसेसची संख्या ४९० इतकी आहे.
मनपाच्या एकूण १९ मैलाशुद्धीकरण केंद्राद्वारे ३३२ दलली प्रतिदिन एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. सदरच्या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केलेले ३१ दलली पाण्याचा प्रति महिना पुनर्वापर रस्ते धुणे कामी तसेच धूळ नियंत्रण प्रणालीमध्ये व उद्यानाकरिता वापरात आणले जाते.
आज पर्यंत एकूण ३,५१,५४२.४३ मे टन एवढ्या घरगुती कचऱ्यावर वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात येत असून त्यापासून १३,६,९४०,८५९ युनिट्सची निर्मिती झालेली आहे. तसेच बांधकाम राडारोडा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये ३९,८२७ मे टन कचऱ्यावर यशस्वीपणे प्रक्रिया करण्यात आली आहे. हॉटेल वेस्ट टू बायोगॅस या प्रकल्पामध्ये एकूण ३५९३ मे टन एवढ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असून त्यापासून १,१२,२४९ किलोग्रॅम बायोगॅसची निर्मिती करण्यात आली आहे.