शबनम न्यूज | प्रतिनिधी
न्यायालय विटांनी बांधलेली इमारत नसून ती न्यायमंदीर आहे, याठिकाणी निष्पक्ष आणि लवकर निर्णयाद्वारे नागरिकांच्या हक्काचे सरंक्षण करण्यासोबतच कायदा आणि राज्यव्यवस्था राखली जाते, यामुळे लोकशाहीवरचा विश्वास दृढ होतो, न्यायदानावरील विश्वास दृढ करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी न्यायाधीश आणि वकीलांची आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांनी केले.
मुळशी तालुक्यातील पौड येथील पूर्णवेळ दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, प्रथम जिल्हा व सत्र न्यायधीश महेंद्र के महाजन, पौडचे प्रथम न्यायदंडाधिकारी सागर मोहीते, आमदार शंकर मांडेकर, महाराष्ट व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. विठ्ठल कोंडे देशमुख, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, आयुबखान पठाण, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड आदी उपस्थित होते.
न्यायमूर्ती मोहीते म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी न्याय पायाभूत सोयीसुविधा आवश्यक आहे. नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती झाल्यामुळे खटल्यांची संख्येत देखील वाढ होत आहे, यावरुन अद्यापही नागरिकांचा न्यायालयावर विश्वास आहे, असे दिसून येते.
न्यायदानातील विलंब हा न्याय नाकारण्याच्या बरोबरीचा असतो. त्यामुळे वकीलवर्ग न्यायदानातील महत्वाचा घटक असल्यामुळे हा विलंब टाळण्यासाठी त्यांचा मोठावाटा आहे. वकील हे नागरिकांच्या हक्काचे धारक आणि रक्षक आहेत. न्यायाच्या माध्यमातून जनसेवा होत असल्याने नवोदित वकिलांनी ज्येष्ठ वकिलांच्या हाताखाली काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, असेही न्यायमूर्ती मोहिते म्हणाल्या.
न्यायमूर्ती मारणे म्हणाले, पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायिक जिल्हा असून राज्यातल्या तेरा टक्के खटल्याचे प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. शिवाजीनगर न्यायालयातील गर्दी कमी करण्याकरिता जिल्ह्यात ठिकठिकाणी न्यायालयांची उभारणी करण्यात येत आहे. मुळशी तालुक्याचा झपाट्याने विकास होत असून येथे पर्यटनाचा विकास होतोय.जमिनींच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे येथे सक्षम न्यायव्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते. नवीन न्यायालयाची भावना म्हणजे सर्वांसाठी न्याय असा आहे, असेही न्यायमूर्ती मारणे म्हणाले.
यावेळी न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर आणि प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांनी आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी विधी व न्याय विभागाचे सहसचिव विलास गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र चोपडे, तहसीलदार विनयकुमार चोबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, जिल्हा न्यायाधीश, बार असोसिएशन आणि वकील संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुळशी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संभाजी बलकवडे, ॲड.संजय मारणे, ॲड. योगेश साठे, ॲड.रणजित टेमघरे, ॲड. अमोल शितोळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. जिल्हा न्यायाधीश अरविंद वाघमारे, विलास कचरे व किशोर शिंदे यांनी त्यासाठी सहकार्य केले.
ॲड. बलकवडे यांनी प्रास्ताविक केले आणि न्यायदंडाधिकारी मोहीते यांनी आभार मानले.