शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने क्रेडिट प्रणाली लागू केल्यापासून विद्यार्थ्यांना आता गुणाऐवजी ग्रेड स्वरूपात गुणपत्रिका देण्यात येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षेतील अचूक गुणांची माहिती मिळावी, हा त्यांचा कायदेशीर हक्क असून, विद्यापीठ गोपनीयतेच्या नावाखाली ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने माहितीच्या अधिकारात मार्च-एप्रिल २०२५च्या परीक्षेतील स्वतःच्या गुणांची प्रमाणित प्रत मिळावी, यासाठी अर्ज केला होता. विद्यापीठाच्या माहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती गोपनीय असल्याचे कारण देत ती देण्यास स्पष्ट नकार दिला. या निर्णयाविरोधात संबंधित विद्यार्थ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विद्यापीठाच्या कारभारावरही संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्याने याबाबत राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई विरुद्ध आदित्य बंदोपाध्याय (२०११) या प्रकरणात विद्यार्थ्याला स्वतः च्या मूल्यांकनाशी संबंधित सर्व माहिती मिळण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्याची आठवण या विद्यार्थ्याने करून दिली. ही माझी स्वतःची माहिती असून, कोणाच्याही खासगी माहितीचा भंग होत नाही. त्यामुळे विद्यापीठाने माहिती नाकारण्याचे कारण सांगावे, असा प्रश्नही या विद्यार्थ्याने उपस्थित केला. या प्रकरणाबाबत विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.