शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघ आणि ईशा नेत्रालय पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ईशा नेत्रालय, प्रीमियर प्लाझा, बिग बजार, चिंचवड स्टेशन येथे हे नेत्रचिकित्सा शिबीर घेण्यात आले. नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन ईशा नेत्रालयाचे पुणे ब्रांच इन्चार्ज दीपक कदम व पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात आली. त्याबरोबरच डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. वैभव अवताडे,डॉ. जयशील नाझरे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. वैभव अवताडे म्हणाले की, बीपी तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांनी डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. वेळीच काळजी घेतली तर दृष्टी वाचवता येईल. आजार वाढल्यानंतर रुग्ण रुग्णालयात धाव घेतात अशा वेळी फक्त असलेली दृष्टी टिकवणे शक्य होते. त्याबरोबरच 40 वर्षापेक्षा अधिक वय झाल्यानंतर सर्वांनीच डोळ्याचा पडदा,प्रेशर याची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयशील नाझरे म्हणाले की, लहान मुलांनाही मधुमेह तसेच मोतीबिंदू होऊ शकतो. मात्र हे वेळीच लक्षात येत नाही. कधी कधी पालक चष्म्याचा आळस करतात. त्यामागे आर्थिक कारणे ही असतात. मात्र पुढे लष्करात किंवा पोलिसात भरती होण्याची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा नैराश्य येते. त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.
इशा नेत्रालयाचे पुणे ब्रांच इन्चार्ज दीपक कदम यांनी ईशा बद्दल माहिती दिली. ईशान नेत्रालयाच्या पुणे, दादर, ठाणे कल्याण अंबरनाथ खडकपाडा घाटकोपर येथे शाखा आहेत. गेल्या 25 वर्षात 16 लाख पेक्षा जास्त लोकांची तपासणी करण्यात आली एक लाख 70 हजार पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पुणे शाखेत दररोज 90 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. इशा रुग्णालयात 18 सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर गणेश कांबळे, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यशवंत बो-हाडे यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला.