spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’चा भावनिक आरंभ

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड, २ ऑगस्ट २०२५ – पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी आपल्या मातीची आठवण घेऊन आलेल्या ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चा आज, शनिवारी, अत्यंत भावपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. आपल्या मूळ गावापासून दूर असले तरी, परंपरेची वीण आणि संस्कृतीचे धागे घट्ट धरून ठेवणाऱ्या खान्देशी समाजाचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर येथे सप्ता पूजन आणि गहू दळण्याचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याला महिला भगिनी आणि सर्व खान्देशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खान्देशाची आठवण करून देणाऱ्या पारंपरिक वेशभूषेत महिलांनी गहू दळताना कानबाई मातेची भक्तिगीते गायली आणि वातावरण भक्तीमय झाले.
यावेळी, प्रसिद्ध गीतकार अशोक वनारसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “किल्लू नि भाजी कयन्यानी भाकर” हे पारंपारिक खान्देशी गीत सादर केले. या लोकगीताने उपस्थितांच्या डोळ्यांत खान्देशाची आणि आपल्या जुन्या आठवणींची झलक आणली. त्यानंतर, उपस्थितांनी सामूहिक आरती करून कानबाई मातेचा जयघोष केला. आपल्या संस्कृतीचा हा सुगंध पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या क्षणी सर्वांनी केला.
या उत्सवाचे प्रमुख संयोजक श्री. नामदेवराव ढाके यांनी सर्व खान्देशी बांधवांना या सांस्कृतिक सोहळ्यात सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान वाटून घेण्याचे आवाहन केले आहे. उद्या, दि. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!