शबनम न्यूज | प्रतिनिधी
अमेरिकेने अलीकडेच काही भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लावल्याने महाराष्ट्रातील अनेक लघु आणि मध्यम उद्योजक अडचणीत आले आहेत. यामुळे राज्यातील निर्यात घटण्याची आणि हजारो कामगारांवर बेरोजगारीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, “या संकटावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदन दिले असून, केंद्र सरकारकडे योग्य त्या स्तरावर चर्चा करून निर्यातदारांना दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.”
महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांचे उत्पादन हे अमेरिकन बाजारपेठांवर अवलंबून आहे. फार्मासिटिकल्स .ऑटो पार्ट्स, इंजिनिअरिंग वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि औद्योगिक साहित्य या क्षेत्रांवर विशेष परिणाम होणार असल्याचे श्री. भोर यांनी सांगितले.
शासनाने पुढील उपाययोजना कराव्यात अशी मागणी:
1.केंद्र सरकारकडे या विषयावर त्वरित पाठपुरावा करून सवलतीसाठी धोरणात्मक पातळीवर चर्चा करावी.
2. आयात शुल्कामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य पातळीवर विशेष मदत योजना जाहीर करावी.
3. निर्यात करणाऱ्या उद्योगांसाठी सवलतीचे कर्ज, अनुदान योजना व निर्यात प्रोत्साहन सवलती लागू कराव्यात.
4. MSME क्षेत्रासाठी तात्पुरत्या स्वरूपात कर सवलती व प्रक्रिया सुलभीकरण उपाययोजना राबवाव्यात.
“महाराष्ट्रातील लघुउद्योजक हे अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांचे रक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असेही श्री. अभय भोर यांनी स्पष्ट केले.