अ, ब, क,ड आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्य प्रकाशन समारंभ प्रसंगी अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. यावेळी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमित गोरखे यांनी सुरू केलेल्या #माहिती_नसलेले_अण्णाभाऊ या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या उपक्रमाचे उद्दिष्ट अण्णाभाऊंच्या जीवनातील अज्ञात गोष्टी समाजासमोर आणणे हे आहे. या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अनेक गोष्टी अजूनही अज्ञात आहेत. त्या गोष्टी समाजातील सामान्य माणसाला बळ देणाऱ्या, वंचितांना आवाज देणाऱ्या आहेत. त्यांचे हे कार्य जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.”
याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ‘अ ब क ड’च्या मागणीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, “आपली आरक्षण उपवर्गीकरण ‘अ ब क ड’ची मागणी अंतिम टप्प्यात आली आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार हेमंत रासने, आमदार सुनील कांबळे, आमदार विजय शिवतारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या घोषणेमुळे समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली असून, अण्णाभाऊंच्या विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.