पुणे, : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, प्रमुख पाहुणे संत तुकाराम महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य रविंद्र बापूसाहेब पठारे, प्रमुख व्याख्याते प्राध्यापक प्रकाश नाईक (एम.ई. नेट जे.आर.एफ.), सहा. लेखा अधिकारी विलास पाटील, गृहप्रमुख मिनाक्षी नरहरे, तसेच जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य संतोष कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक नाईक ‘समतावादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे’ या विषयावर व्याख्यानात म्हणाले, फक्त दिड दिवस शाळा शिकणारे लोकशाही अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथा संग्रह, १२ पटकथा, नाटक, पोवाडे, लोकगिते अशी विपुल ग्रंथ संपदा त्यांच्या लेखनीतून साकारली.
श्री. लोंढे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लेखक आणि लोककवी होते. त्यांनी समाजातील गरीब आणि वंचितांसाठी खूप कार्य केले. त्यांनी अनेक पुस्तके, कथा, लोकनाट्ये लिहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देते. त्यांचे प्रेरणादायी विचार घेऊन जीवनाची वाटचाल यशस्वी होऊ शकेल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. पठारे यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन समता, न्याय व बंधुता जोपासण्याचे उपस्थितांना अवाहन केले.
कार्यशाळेची सुरुवात राष्ट्रगीत व संविधान प्रास्ताविकेच्या सामुहीक वाचनाने करण्यात आली. यावेळी उपस्थितांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखन साहित्याच्या प्रती देऊन स्वागत करण्यात आले. गृहप्रमुख श्रीमती नरहरे यांनी प्रास्ताविक केले. अशासकीय सदस्य श्री. कांबळे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांना शुभेच्छा संदेश दिला.
कार्यक्रमामध्ये पारलिंगी व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरीत करणेत आले. तसेच गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृह युनिट क्र.१ मधील विद्याथ्यर्थ्यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड व लोकगीते सादर केली. तसेच विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृह युनिट क्र.१ व संत जनाबाई गुणवंत मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी ‘स्मशानातील सोनं’ या कथेवर आधारीत व विविध सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे पथनाट्य सादर केले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरीक संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी, पारलिंगी व्यक्तींसाठी कार्यरत संस्था व पारलिंगी व्यक्ती, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग, पुणे व सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे या कार्यालयातील तसेच विविध महामंडळातील अधिकारी व कर्मचारी, पुणे व पिंपरी चिंचवड या शहरी भागातील शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख, गृहपाल, वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थीनी, बार्टी कार्यालयातील तालुका समन्वयक, समतादूत प्रकल्प अधिकारी व समतादूत उपस्थित होते.