महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांची आयुक्तांविरोधात आंदोलनाची चेतावणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज भरणा होणाऱ्या रकमेत १८,६६,३८८ रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे महापालिकेच्या विशेष लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे. या प्रकरणी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि लिपिक यांचा सहभाग असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आठ दिवसांत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ न केल्यास महापालिकेत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार, महसूल स्वीकारल्यानंतर दोन दिवसांत बँक किंवा कोषागारात रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, जिजामाता रुग्णालयात १८.६६ लाख रुपये १० दिवस ते एक महिना उशिरा जमा केल्याचे आणि साठा रजिस्टरमध्ये पावती पुस्तकाची नोंद नसल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद आहे. लिपिक आकाश गोसावी यांनी पोटकिर्द लिहिणे, रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे यासारख्या आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
या घोटाळ्यात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवी, डॉ. वैशाली बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जतिन होतवानी आणि डॉ. विकल्प भोई यांचा सहभाग असल्याचा आरोप नढे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आयुक्तांनी केवळ आकाश गोसावी यांच्या दोन वेतनवाढी रोखण्याची किरकोळ कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर ऑगस्ट २०२४ मध्ये गोसावी यांनी पुन्हा १,६२,०४७ रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, यातही वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप आहे.
“हा शासकीय रकमेची चोरीचा फौजदारी गुन्हा आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी या घोटाळ्याला मुकसंमती दिली असून, दोषींवर ठोस कारवाई टाळली जात आहे,” असा घणाघात नढे यांनी केला. त्यांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी १ जुलै २०२४, ५ जुलै २०२४, २ ऑगस्ट २०२४ आणि १० जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भात निवेदने देऊनही कारवाई न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
“पुढील आठ दिवसांत कारवाई न झाल्यास महापालिकेत तीव्र आंदोलन छेडू. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयुक्तच जबाबदार राहतील,” असा इशारा नढे यांनी दिला आहे यावेळी स्वाती शिंदे, प्रियांका सगट, प्रज्ञा जगताप आशा भोसले, प्रिया कोळेकर, आबा खराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला असून, आगामी काळात यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.