पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी,-
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील सर्वे नंबर 194/1,194/2,195,196, प्लॉट नंबर 191 ते 209 तसेच प्लॉट नंबर 210 ते 216 व 217 ते 258 जाधव वस्ती येथे झोपडपट्टी नसताना गलिच्छ वस्ती असा झोपडपट्टी सदृश्य अहवाल देणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
मच्छिंद्र तापकीर यांनी निवेदनात नमूद केले कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मच्छिंद्र तापकीर यांनी सदर मागणीचे निवेदन दिले, रावेत जाधव वस्ती येथे स्थानिक गाववाले जाधव यांची घरे आहेत तेथे झोपडपट्टी नाही , महानगरपालिकेने 2000 साली मशाल संस्थेमार्फत करण्यात आलेल्या शहरातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणात समावेश नाही तसेच 2019 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने कॅनबेरी संस्थेच्या मार्फत करण्यात आलेल्या झोपडपट्टी सर्वेक्षणात ही रावेत मधील जाधव वस्ती झोपडपट्टी नसल्यामुळे त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. येथे स्थानिक मागासवर्गीय गाववाले जाधव यांची वडिलोपार्जित जागा असून त्यावर जाधव कुटुंबीयांची स्वतःची घरे आहेत. सदर जागा ही पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने काही ठिकाणी अधिग्रहित केली आहे. त्यामध्ये ओपन स्पेस व काही प्रमाणात प्लॉटिंग केले आहे या बाबत चा वाद अद्यापही सुरू आहे तरीसुद्धा एस आर ए प्रकल्पातून मिळणाऱ्या टीडीआर मधून अंदाजे १५०० ते २००० करोड रुपयांचा मलिदा खाण्याचा घाट बिल्डर , अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला आहे सदर प्रकल्पाला येथील स्थानिक रहिवाशींनी प्रथम पासूनच विरोध दर्शविला आहे.
रावेत येथील जाधव वस्ती येथे झोपडपट्टी नसताना स्थानिक रहिवाशांना अंधारात ठेवून येथे राहत नसलेले नागरिकांचे संमती पत्र भरून बिल्डरने महापालिकेचे झोपडपट्टी निर्मूलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि एस आर ए संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हात मिळवणी करून शासनाची ची दिशाभूल करून प्रकल्प मंजूर करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच झोपडपट्टी नसताना दिशाभूल करून एस आर ए सारखा प्रकल्प दाखल करून टीडीआर च्या स्वरूपात आर्थिक घोटाळा करण्याच्या तयारीत असलेले बिल्डर व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.