शबनम न्यूज | प्रतिनिधी
विकासकामे करत असताना ज्येष्ठ नागरिक आम्हाला वारंवार विविध सुचना करत असतात. त्यांच्या सुचना आम्हाला विकासकामासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतात असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड मनपाचे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले. पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ज्येष्ठांनी त्यांनी संवाद साधला.
नानांच्या हस्ते यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुवार दि. ३१ जुलै रोजी गोविंद गार्डन हॉटेलच्या बांसुरी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नाना काटे यांच्यासह पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शत्रृघ्न बापू काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संचालक संजय भिसे, डॉ. कुंदाताई भिसे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जगन्नाथ काटे, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ आणि सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन आणि सरस्वतीचे प्रतिमा पूजन करण्यात आले. शोभा राजगुरे, निर्मला कासार आणि आणि शकुंतला शिंदे यांनी स्वागतगीत सादर केले. असोसिएशनचे सचिव सखाराम ढाकणे यांनी अहवाल वाचन केले. खजिनदार सुभाष पाटील यांनी आर्थिक लेखा जोखा सादर केला. डॉ. सुभाष पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात गीत – संगीत मैफलीत भारती न्यायाधीश आणि संतोष माहेश्वरी या कलावंतांनी बहारदार हिंदी – मराठी गाण्यांव्दारे उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. विसरू नको श्रीरामा मला, परदेसीयॉं ये संच पिया, जय जय शिवशंकर या काही गाण्यांना ज्येष्ठ नागरिकांनी विशेष प्रतिसाद दिला. त्याआधी पद्मा गवळी आणि सहकाऱ्यांनी भजन सादर केले. त्यांना मृदंगावर प्रकाश दळवी आणि संवादिनीवर बाळकृष्ण चौधरी यांनी साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी शकुंतला शिंदे यांनी सांभाळली. आभार विवेकानंद लिगाडे यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी रमेश वाणी, अनिल कुलकर्णी, रमेश चांडगे, अशोक येळंमकर, अनिलकुमार शाह यांनी परिश्रम घेतले.