‘डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज सकाळी अचानक महापालिकेच्या चऱ्होळी बु. येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी बाकावर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची तपासणी केली. यंदाच्या वर्षी मिळालेले साहित्य कसे वाटते, याबाबात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही त्यांनी जाणून घेतल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासाठी डीबीटी उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेच्या १४६ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा थेट लाभ मिळावा, या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट मिळाले आहे का, याची तपासणी आता शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी थेट आज चऱ्होळी बु. येथील शाळेला अचानक भेट देत तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचा दर्जा कसा आहे, हे देखील जाणून घेतले.
जांभळे पाटील यांनी शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम ते इयत्ता चौथीच्या वर्गात गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी हा कितवीचा वर्ग आहे? तुम्हाला गणवेश मिळाला का? वर्गात किती विद्यार्थी आहेत? आज कोण गैरहजर आहे? तुम्हाला शैक्षणिक साहित्य मिळाले का? रंगपेटी मिळाली का? यंदाच्या वर्षी शैक्षणिक साहित्यात देण्यात आलेली पाण्याची बाटली आवडली का? तुम्हाला मिळालेले सर्व साहित्य व्यवस्थित आहे का? शिष्यवृत्ती परीक्षेला कोणकोण बसणार आहे? शाळा किती वाजता भरते? तुम्हाला कोणता विषय आवडतो? असे प्रश्न विचारत विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी देखील जांभळे पाटील यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. यावेळी जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शिष्यवृत्ती उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या भारत दर्शन उपक्रमाची देखील माहिती दिली.
चऱ्होळी बु. शाळेतील जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे कीट मिळाले असल्याचे निर्देशनास आले. तर उर्वरीत विद्यार्थ्यांना अद्याप कीट का मिळाले नाही, याबाबत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी माहिती घेतली. त्यानंतर तातडीने शैक्षणिक साहित्याचे कीट मागवून घेत विद्यार्थ्यांना वाटप केले. यावेळी सदर शैक्षणिक कीट स्वतःच्या हाताने फोडून त्यामध्ये असणाऱ्या साहित्याची तपासणी जांभळे पाटील यांनी केली. यावेळी काही विद्यार्थ्यांना गणवेश व शूज मिळाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना दोन दिवसाच्या आत गणवेश व शूज देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर होईल, याची काळजी घेण्याच्या सूचनाही शाळेल्या शिक्षकांना दिल्या.
तसेच शाळेतील स्वच्छतागृहाची देखील अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी तपासणी केली. त्यानंतर स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करण्याबाबत त्यांनी आरोग्य विभाग, क्षेत्रिय अधिकारी यांना फोन लावून निर्देश दिले. तसेच शाळेल्या वर्गामध्ये असणारी वायरिंग व्यवस्थित करण्याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून निर्देश दिले. शाळेतील सीसीटीव्ही सुरू आहेत का, याचीही तपासणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या वाढवण्यात याव्यात, शाळेचे मुख्य प्रवेशद्वार मोठे करावे, अशी मागणी शाळेतील शिक्षकांनी केली. त्यानंतर शाळेतील वर्गखोल्यांची संख्या वाढवण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवणे व शाळेचे मुख्य प्रवेशद्वार मोठे करण्याबाबत संबंधित विभागाला जांभळे पाटील यांना निर्देश दिले.
शालेय पोषण आहाराची घेतली माहिती
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत देखील अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी माहिती घेतली. तसेच पोषण आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण तपासण्यासाठी तो स्वतः खाऊन पाहिला. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची गुणवत्ता ही उत्तमच असावी. त्याची वेळोवेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी तपासणी करावी. त्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करू नका, असे निर्देशही त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा दर्जा तपासणे व विद्यार्थ्यांच्या या साहित्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज चऱ्होळी बु. येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेला भेट दिली होती. तसेच महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनांचा त्यांना फायदा कितीपत होत आहे? भारत दर्शन सारख्या उपक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती आहे का? हे जाणून घेण्याचा उद्देशही या भेटीमागे होता. आगामी काळामध्येही अशा प्रकारे अचानक शाळांना भेट देऊन तपासणी सुरू राहतील.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका