औद्योगिक आणि नागरी विकासाला नवा आयाम मिळण्याची शक्यता
शबनम न्यूज :प्रतिनिधी
तळेगाव–चाकण–शिक्रापूर (NH-548D) या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेवर आता ठोस पावले उचलली जात असून, वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्याच्या उन्नतीसाठी सखोल चर्चा झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार बाळा भेगडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, एनएचएआय, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मार्गाची स्थिती आणि महत्त्व:
या मार्गाची एकूण लांबी: ५३.२०० किमी, त्यातील तळेगाव–चाकण विभाग २८.३०० किमी आणि मावळ तालुक्यातील १२.५८० किमी आहे तर या रस्त्याचे पुणे–मुंबई, पुणे–नाशिक व पुणे–संभाजीनगर या मुख्य महामार्गांशी थेट जोड होत आहे त्याचप्रमाणे हजारो अवजड वाहने, शेतमाल वाहतूक करणारी वाहने, कामगार व विद्यार्थ्यांची दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक या मार्गावरून होत आहे या मार्गाची सध्याची चिंताजनक परिस्थिती असून रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रचंड खड्डे तयार झाले आहेत तसेच या मार्गावर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याने अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे तसेच मोठ्या प्रमाणात वेळेचा व इंधनाचा अपव्यय होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत याचा परिणाम थेट औद्योगिक आणि सामाजिक जीवनमानावर होत आहे
ऐतिहासिक पावले आणि सकारात्मक उपाययोजना:
✅ २१ मे २०२५ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय – तळेगाव–चाकण मार्ग चार पदरी (४-लेन) उन्नत करण्यास आणि समांतर ४ पदरी मार्ग उभारण्यास मान्यता
✅ निविदा प्रक्रिया सुरू – लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात
✅ भूसंपादन अंतिम टप्प्यात, उर्वरित मालमत्तेसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा
✅ तातडी दुरुस्तीचे आदेश – खड्डे बुजवणे, साईड पट्टे दुरुस्ती, वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथकांची नेमणूक
भविष्यातील लाभ:
– अपघातांचे प्रमाण घटणार
– प्रवास वेळ आणि इंधनात बचत
– स्थानिक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा
– उद्योगधंद्यांना वेग आणि स्थिरता
– पर्यावरणीय व आर्थिक नुकसान टळणार
– संपूर्ण परिसराचा समांतर विकास सुनिश्चित
महायुती सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी घेतलेला पुढाकार मावळ, चाकण आणि शिक्रापूर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजक, ट्रान्सपोर्टर, शेतकरी यांच्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे.
या निर्णयामुळे केवळ मार्गाची नवसज्जता नव्हे, तर संपूर्ण औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार असून, येत्या काळात नवीन गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे.