spot_img
spot_img
spot_img

दिव्यांग बांधवांमधील कौशल्यांचे विश्लेषण करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उपयुक्त ठरेल – आयुक्त शेखर सिंह

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये झाली सेंटरची सुरवात

पिंपरी, ३० जुलै २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये सुरू करण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्र दिव्यांग बांधवांमधील कौशल्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दिव्यांग व्यक्तीमधील कौशल्य शोधून त्यानुसार त्याला योग्य काम मिळवून देण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची असणार आहे,’ असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे इनबेल इंडिया आणि रोहिणी संस्था यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदीता घार्गे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, इनबेल इंडिया संस्थेच्या शांती राघवन, रोहिणी संस्थेचे अक्षय सरोदे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, खासगी कंपनीचे प्रतिनिधी, दिव्यांग बांधव उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले, ‘दिव्यांग बांधवांसाठी वर्क प्लेस सोल्युशन शोधण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. दिव्यांगांना औद्योगिक क्षेत्रामध्ये काम मिळावे, यासाठी लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. इनबेल इंडिया व रोहिणी संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्समुळे आता दिव्यांग व्यक्तीमधील कौशल्य ओळखून, त्याचे विश्लेषण करून त्यानुसार त्यांना नोकरी देणे शक्य होणार आहे. दिव्यांग व्यक्तीला येणाऱ्या दैनंदिन अडचणींवर कशा प्रकारे ते मात करू शकता, याबाबतही माहिती या केंद्रातून मिळू शकरणार आहे. दिव्यांग व्यक्ती विविध क्षेत्रात कशा प्रकारे काम करू शकतात, याची माहितीही येथे मिळणार आहे. त्यामुळे हे केंद्र खऱ्या अर्थाने दिव्यांगांना सक्षम करण्यास उपयुक्त ठरणार आहे.’

व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांग भवनच्या कामाबाबत माहिती सांगताच दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘दिव्यांगांच्या सर्वेक्षणातून जी माहिती संकलित होईल, त्याचे विश्लेषण करून कामाची गती वाढवता येईल. दिव्यांगांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल.’

उपायुक्त ममता शिदे म्हणाल्या की, ‘दिव्यांग बांधवांसाठी काम करताना भाषेचा अडथळा कुठेही येणार नाही, यादृष्टीनेही आम्ही नियोजन करीत आहोत. पुढील पाच वर्षात जास्तीतजास्त दिव्यांगांना कौशल्याआधारित रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यास प्राधान्य दिले जात आहे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांनी तर सूत्रसंचालन आर्या तेंडूलकर यांनी केले. परेश गांधी यांनी आभार मानले.
……..
आयुक्तांनी घेतली सेंटर ऑफ एक्सलन्सची माहिती

सेंटर ऑफ एक्सलन्सचे उदघाटन केल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी इनबेल इंडियाच्या शांती राघवन व रोहिणी संस्थेचे अक्षय सरोदे यांच्याकडून घेतली. दिव्यांग व्यक्तीला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे सेंटर कसे उपयोगी पडू शकते, याबाबत सविस्तर माहिती शांती राघवन यांनी दिली. तर, दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या सेंटरचा कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत माहिती अक्षय सरोदे यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!