शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोरिया मधील आयसीसीके आणि पीसीईटी यांच्या मध्ये झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारामुळे भारतातील शैक्षणिक व उद्योग क्षेत्रास उपयोग होईल. त्यातून सांस्कृतिक सहकार्याला देखील चालना मिळेल तसेच दोन्ही देशातील संशोधन आणि व्यावसायिक विकासात अनेक नव्या संधी उपलब्ध होतील असे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. २५ जुलै) इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरिया (आयसीसीके) आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. पीसीईटीच्या ट्रस्ट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आयसीसीकेचे चेअरमन आणि टीसीएस दक्षिण कोरिया चे प्रमुख रमेश अय्यर, क्रॉसकाउंटी इन्फोटेकच्या वैदेही कुलकर्णी, पीसीटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संबंध सल्लागार डॉ. दिनेश अमळनेरकर, पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभाग अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत, विद्यार्थी विकास आणि कल्याण विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. के. राजेश्वरी आदी उपस्थित होते.
यावेळी पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, हा करार म्हणजे भारत आणि कोरिया या दोन देशांमधील शिक्षण, वाणिज्य, उद्योग, व्यापार, रोजगार, संशोधन या क्षेत्रात वाढ होण्यासाठी उपयुक्त आणि इतर विद्यापीठांना मार्गदर्शक ठरेल. आणि जागतिक पातळीवर या दोन्ही संस्थांना आणखी सक्षमपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी चालना मिळेल. पीसीईटीच्या विद्यार्थ्यांना कोरियामध्ये आणि कोरिया मधील विद्यार्थ्यांना भारतामध्ये येऊन शिक्षण संशोधन करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल. यातून सांस्कृतिक देवाणघेवाण व विद्यार्थी विनिमय कार्यक्रम अधिक सक्षमपणे राबवता येईल. नवउद्योजकांना संयुक्तपणे संशोधन करून आपले उद्योग प्रकल्प विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ निर्माण होईल, यामुळे दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहेत. या ट्रस्ट अंतर्गत संचलित होणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व संशोधन केंद्रांमध्ये प्रवेश घेण्यास पालक व विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. नव्याने स्थापन झालेल्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) देखील असेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उद्योजक व रोजगार सक्षम करण्यात येत आहे. पीसीईटीच्या हजारो विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल केले आहे याचा विश्वस्तांना व येथील प्राध्यापकांना अभिमान वाटतो.