शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
खराडी भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. तरुणाला गुंतवणूक योजनांबाबतची माहिती दिली. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरले. पैसे भरल्यानंतर सुरुवातीला त्याला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.
हडपसर भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी आठ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.