spot_img
spot_img
spot_img

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. या निवडणुकीसाठी “राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम, १९५२” आणि त्याखालील “नियम, १९७४” लागू होतात.

या अधिनियमाच्या कलम ३ नुसार, निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करतो, ज्यांचे कार्यालय नवी दिल्ली येथे असते. याशिवाय, एक किंवा अधिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही नियुक्त केले जाऊ शकतात. परंपरेनुसार, लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालयाचे महासचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आलटून पालटून नियुक्त केले जातात. मागील उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव निवडणूक निर्णय अधिकारी होते.

त्याअनुषंगाने, आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यसभा सचिवालयाचे महासचिव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कायदा व न्याय मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार आणि राज्यसभेचे उपसभापती यांची संमती घेऊन करण्यात आली आहे.

याशिवाय, श्रीमती गरिमा जैन, संयुक्त सचिव (राज्यसभा सचिवालय) आणि श्री विजय कुमार, संचालक (राज्यसभा सचिवालय) यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत राजपत्र अधिसूचना स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!