शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील शरद नगर मळेकर उद्यानाची दुरावस्था झाली असून त्वरित उद्यानांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मळेकर उद्यानामध्ये अस्वच्छता, तुटलेली खेळणी, आणि वाढलेले गवत, बाथरूमची झालेली दुरावस्था हे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. शहरातील अनेक उद्यानांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. उद्यानांमध्ये कचरा आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे नागरिकांना फिरण्यासाठी अस्वस्थ वाटते.
त्याचप्रमाणात लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्याची मोडतोड झाली आहे, ज्यामुळे मुलांना खेळायला मिळत नाही, गवत आणि झुडपे वाढलेली आहेत, ज्यामुळे उद्यानांची सुंदरता कमी झाली आहे आणि डासांची संख्या वाढली आहे. पायी चालण्यासाठी असलेले रस्ते (वॉकिंग ट्रॅक) खराब झाले आहेत.
उद्यान विभागाकडून याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी मोठा निधी खर्च केला जातो, पण त्याची योग्य देखभाल होत नसल्याने गैरप्रकार होत असल्याचा आरोप देखील आहे.