शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : काेथरूड भागात ज्येष्ठ दाम्पत्याच्या सदनिकेतून साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरुन पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन सराइत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोथरूड भागातील हॅप्पी काॅलनीत एका सोसायटीत ज्येष्ठ दाम्पत्य राहायला आहे. ७ मार्च रोजी बंद सदनिकेचे कुलूप तोडून अल्पवयींनांनी कपाटातील साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांनी घटनास्थळी भेट दिली. घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
त्यानंतर तपास पथकाने सदनिकेत चोरी करुन पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी कोथरूड परिसरातील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.