शबनम न्यूज | प्रतिनिधी
नारायणगाव : सरकारी कार्यालयाकडून वेगवेगळ्या योजना मिळवून देतो,असे सांगत एका महिलेची फसवणूक करणाऱ्या इसमावर ओतूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे , अशी माहिती ओतूर पोलीस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
याबाबत आरोपी राजेश रघुनाथ मुकणे, राहणार खालचा माळीवाडा, ता. जुन्नर, जि.पुणे याच्या विरोधात ओतूर पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.फसवणूकी फिर्याद सुशीला धोंडीभाऊ जाधव (वय ५० वर्ष) रा. ओतूर, कातकरी वस्ती, ता. जुन्नर, जि.पुणे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आदिवासी कातकरी समाजातील गरीब महिला सुशिला जाधव यांना राजेश मुकणे याने शासकीय कार्यालयाकडून शासकीय जमीन तुमच्या नावावर करून देतो, असे खोटे सांगत पंधरा हजार रूपये घेतले. तसेच मुकणे याने आणखी इतर कातकरी समाजातील गरीब महिला व पुरूष यांच्याकडून त्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे, माझी तेथे ओळख आहे, येथून विविध योजना मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून काही रोख व ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेऊन त्यांची देखील फसवणूक केली आहे. या प्रकरणी जाधव यांचे फिर्यादीवरून ओतूर पोलीस स्टेशन येथे मुकणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी हे करीत आहेत.