शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यभरातील शाळांना शाळेतील सुविधा, शिक्षक, विद्यार्थी यांची अद्ययावत माहिती यूडायस प्लस प्रणालीत भरावी लागणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळांना माहिती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून यूडायस प्रणाली आणि सरल प्रणालीतील माहितीचे एकत्रीकरण करण्यात येणार असल्याने सतत माहिती भरण्यापासून शाळा, शिक्षकांची सुटका होणार आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी या बाबतचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले. केंद्र सरकारने शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांच्या अद्ययावत माहितीसाठी यूडायस प्लस प्रणाली सुरू केली आहे. प्रणालीमध्ये भराव्या लागणाऱ्या शाळा तपशीलामध्ये मुख्याध्यापक, शाळेचा पत्ता, शाळेचा अभ्यासक्रम, पूर्व प्राथमिक वर्ग, भौतिक सुविधा, पीजीआय निर्देशांक, इंटनेट सुविधा यांच्या माहितीचा समावेश आहे.
यूडायस प्रणाली आणि सरल प्रणालीच्या एकत्रीकरणामुळे यूडायस प्रणालीमध्ये नोंदवलेली माहिती सरल प्रणालीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या तपशीलामध्ये विद्यार्थी प्रमोशन, दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे, पुनर्प्रवेशित विद्यार्थी, ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे.शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये ९५ टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण करावी. तसेच, ८६ टक्के विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळा स्तरावरून यूडायस प्लस प्रणालीत करण्यात आली आहे.