शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५२ अनिवासी गाळे, २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने वितरित करण्याबाबत २१ जून २०२५ रोजी जाहिरात देण्यात आली होती. तथापि, नागरिकांच्या मागणीनुसार ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरिता १ ऑगस्ट २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र नागरिकांना १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणीअभावी रिक्त राहीलेल्या सदनिका विकासकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वितरित करण्याचे नियोजन आहे.
सदनिका वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना सदनिका वितरित करण्याकरिता https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. विकासकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील तसतशा पडताळणीअंती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहणार आहे. गरजू व पात्र लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नोदणी पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा.
नजीकच्या काळात करण्याचे अंदाजे २ हजार ५०० सदनिकांची सोडत याव्यतिरिक्त नजीकच्या काळात पुणे मंडळामार्फत १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील अंदाजे २ हजार ५०० सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे, त्यासंबंधी विकासकांकडून प्रस्ताव प्राप्त होत असून सोडतीबाबतची पुढील प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोदणी करावी, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील, मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.