spot_img
spot_img
spot_img

‘कविता हा साहित्याचा आत्मा!’ – राजन लाखे

  • ‘कवितेकडून कवितेकडे…’ साहित्य संमेलन संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘कविता हा साहित्याचा आत्मा आहे!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी व्यक्त केले. नांदेड येथे संपन्न होणाऱ्या विसाव्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनपूर्व एकदिवसीय ‘कवितेकडून कवितेकडे…’ या संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, महाराष्ट्र समरसता साहित्य परिषद कोषाध्यक्ष सुनील ढेंगळे, प्रांत संयोजक प्रा. डॉ. धनंजय भिसे, वन्यजीव अभ्यासक डॉ. सुधीर हसमनीस, समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच संमेलनात नीलेश गद्रे, विलास लांडगे, सुरेश जोशी, क्षितिज गायकवाड, राजेंद्र घावटे, राज अहेरराव, सुरेश कंक यांनी उपस्थिती दर्शवली.

उमा खापरे यांनी, ‘अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी आयुष्य समर्पित केले. राजकीय वारसा नसतानाही माझी कारकीर्द घडविण्यात संघ परिवाराचे योगदान आहे!’ अशी भावना व्यक्त केली. सुनील ढेंगळे यांनी, ‘संपूर्ण भारत देश हा साहित्याने जोडलेला आहे!’ असे मत मांडले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विषयावरील जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्वरा देशमुख या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ईशस्तवनानंतर आणि पंचमहापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुहास घुमरे यांनी प्रास्ताविकातून ‘नव्वदोत्तरी कविता’ या विषयावर संमेलन केंद्रित असल्याची माहिती दिली.

उद्घाटन सत्रानंतर डाॅ. वैशाली मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ‘नव्वदोत्तरी कवितेतील स्थित्यंतरे’ या परिसंवादात अरुण बोऱ्हाडे (नव्वदोत्तरी कामगार कविता), अभिजित काळे (नव्वदोत्तरी गझल), मानसी चिटणीस (नव्वदोत्तरी ग्रामीण कविता) यांनी ऊहापोह केला. डाॅ. वैशाली मोहिते यांनी, ‘समाजाची गती, स्थिती, प्रयोजन जाणण्याचे साधन म्हणजे साहित्य होय!’ असे अध्यक्षीय मत मांडले. त्यानंतर ‘करम बहावा’ या सत्रात चिन्मयी चिटणीस, भालचंद्र कुलकर्णी, डाॅ. मंदार खरे, निरुपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मिलिंद छत्रे, वैशाली माळी यांनी पिवळ्या रंगाची वेषभूषा परिधान करून वैविध्यपूर्ण आशयविषयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. संमेलनाच्या अंतिम सत्रात प्रा. सुरेखा कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विनायक कुलकर्णी आणि आनंद हरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे वीस निमंत्रित कवींनी बहारदार कवितांचे सादरीकरण करीत श्रोत्यांची दाद मिळवली.

जयश्री श्रीखंडे, पंजाबराव मोंढे, सीताराम सुबंध, राजेंद्र भागवत, कैलास भैरट, सुप्रिया लिमये, श्रद्धा चटप, स्नेहा पाठक, राजू जाधव, सुनीता बोडस, स्वाती भोसले, मंगला पाटसकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अनुक्रमे उज्ज्वला केळकर, हेमंत जोशी, वैजयंती आपटे, नीलेश शेंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!