spot_img
spot_img
spot_img

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त तांत्रिक शिक्षणापुरते न राहता, व्यक्तिमत्व घडविणारे आणि समाजाभिमुख बनतील. हे सक्षम आणि सजग नागरिक घडवण्यासाठी फार उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज गिरगाव चौपाटी (मुंबई) येथील इस्कॉन मंदिराला भेट दिली. शिवाय गोविंद सात्विक उपाहारगृहाचे उद्घाटन केले. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गौरांग दास, राष्ट्रीय शेअर बाजारचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. रामामूर्ती, गोवर्धन इकोव्हिलेजचे सल्लागार रामा सिंग दुर्गवंशी, प्रकल्प प्रमुख नवलजीत कपूर, जननिवास प्रभू यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात पाऊल ठेवताच एक विशेष आध्यात्मिक शांतता व समाधानाचा अनुभव मिळाला. मी सन 2000 मध्ये इस्कॉन आणि गौरांग दास यांच्या सानिध्यात आल्यापासून शाकाहारी झालो. आपल्या देशातील संस्कृती आणि धार्मिकता इतर कोणत्याच देशात नाही. भारत नेहमी संरक्षणात्मक, शांततेच्या मार्गाचा अवलंब करीत आहे.

यावेळी राज्यपालांनी आपल्या भाषणात इस्कॉन संस्थेच्या जागतिक पातळीवरील कार्याचा गौरव केला. इस्कॉनची जगभरात १३०० मंदिरे, ११० उपाहारगृहे आणि ६५ शेती समुदाय आहेत. आजपर्यंत त्यांनी ३.८ अब्जांहून अधिक मोफत अन्नदानाचे कार्य केले असून, ‘फूड फॉर लाईफ’ ही जगातील सर्वात मोठी अन्नदान योजना ठरली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या ‘मिड डे मील’ योजनेतून चार दशलक्षहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना सकस अन्न दिले जाते. या कार्याबाबत राज्यपालांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या सात्विक अन्नविषयक प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी ‘ईट राईट इंडिया’, ‘पोषण अभियान’ आणि ‘श्री अन्न’ अर्थात मिलेट्सच्या जागतिक स्वीकाराचा विशेष उल्लेख केला. यावेळी राज्यपालांनी नूतन ‘गोविंदाज’ या नवीन सात्विक उपाहारगृहाला भेट देवून सात्विक अन्नाचा वापर करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

इस्कॉन मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ती धर्माची आधारशिला आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गौरांग दास यांनी राज्यपालांना इस्कॉनच्या कौशल्य विकास उपक्रमांबद्दल माहिती दिली, यावेळी गोवर्धन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) सात्विक पाककला संस्थेचीही माहिती दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!