सीए चरणज्योत सिंग नंदा म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाची भीती न बाळगता ते तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. शिकण्याची आसक्ती हवी. ‘एआय’मुळे अनेक गोष्टी सहज होत आहेत. केंद्र सरकारने संशोधन व इनोव्हेशनसाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी भारत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बनत आहे. या संधींचा सनदी लेखापालांनी लाभ घ्यावा. आज ५०० पेक्षा अधिक ‘एआय’ प्रशिक्षण वर्ग झाले असून, त्यातून २५ हजार सनदी लेखापालांनी ‘एआय’ मोड्यूल शिकले आहेत. सनदी लेखापालांनी सकारात्मक मानसिकता ठेवण्यासह शरीर व मनाच्या स्वास्थ्यावर लक्ष द्यावे. कुटुंबाला पुरेसा वेळ द्यावा. ‘वर्क लाईफ बॅलन्स’ साधण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.”
‘आयसीएआय’च्या वतीने ‘एआय इनोव्हेशन समिट २०२५’
शबनम न्यूज | प्रतिनिधी
“कृत्रिम बुद्धिमतेमुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. येणारा काळ हा ‘एआय’चा असून, भारतीय सनदी लेखापालांना ‘एआय’चे ज्ञान व्हावे, त्याचा चांगला उपयोग करता यावा, यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सीए विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘एआय’चा समावेश केला जात आहे. त्यामुळे सनदी लेखापाल अधिक तंत्रज्ञानाभिमुख व ‘एआय’ प्रशिक्षित होत आहेत,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी केले.
संसदीय कायद्यानुसार स्थापित दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आयोजित ‘एआय इनोव्हेशन समिट २०२५’, या सनदी लेखापालांसाठीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘अकाऊंटिंग, ऑडिट, कर प्रणाली आणि शासकीय कार्यपद्धतीत परिवर्तन’ अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. बाणेर येथील बंटारा भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए प्रसन्नकुमार डी, सचिव सीए डॉ. जयकुमार बत्रा, ‘आयसीएआय’च्या एआय कमिटीचे चेअरमन सीए उमेश शर्मा, व्हाईस चेअरमन सीए दयानिवास शर्मा, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए केतन सैय्या, आयसीएआय पुणे शाखेचे चेअरमन सीए सचिन मिणियार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे, विभागीय समितीचे, तसेच पुणे शाखेचे पदाधिकारी व १००० पेक्षा अधिक सीए सभासद या परिषदेला उपस्थित होते.
‘आयसीएआय’च्या पुणे शाखेच्या वतीने या परिषदेचे संयोजन केले होते. केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनात विभागीय समिती सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे, पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रज्ञा बंब, सीए नंदकुमार कदम, सीए सारिका दिंडोकार आदींनी संयोजनात परिश्रम घेतले. आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व ओपनएआय सोर्सच्या पब्लिक पॉलिसी अँड पार्टनरशिप हेड प्रज्ञा मिश्रा यांचे ‘एआय’वर बीजभाषण झाले.
सीए प्रसन्नकुमार म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता हा आपल्या व्यवसायाचा अविभाज्य भाग बनला असून, ‘एआय’ आत्मसात केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. लाखो सनदी लेखापाल आणि सीए विद्यार्थी हे नवे तंत्रज्ञान वापरत आहेत. त्याचा आणखी प्रभावी वापर कसा करता येईल. नोकऱ्या जाणार ही भीती मनातून काढायला हवी. नवी कौशल्ये, तंत्र आत्मसात करणाऱ्यांसाठी हे संधींचे भांडार आहे. सव्वाकोटी पेक्षा अधिक रोजगार निर्मिती ‘एआय’मुळे होणार आहे. मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ असून, त्याला कृत्रिम बुद्धिमतेची जोड मिळाल्याने विकासाचा वेग झपाट्याने वाढणार आहे.”
सीए उमेश शर्मा म्हणाले, “गेल्यावर्षी ‘आयसीएआय’ने ‘एआय कमिटी’ स्थापन केल्यापासून कृत्रिम बुद्धिमतेच्या वापराचे प्रशिक्षण अधिक व्यापक झाले आहे. प्रत्येक सनदी लेखापालांना ‘एआय’ प्रशिक्षित करून काळाबरोबर चालण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जवळपास साडेचार ते पाच लाख सनदी लेखापाल येत्या काही महिन्यात हे प्रशिक्षण घेतील. २०२७ नंतर सीए होणाऱ्यांसाठी अभ्यासक्रमात ‘एआय’चा विषय शिकवला जाणार आहे.”
सीए दयानिवास शर्मा, सीए केतन सैय्या यांनीही आपले विचार मांडले. सीए (डॉ.) जयकुमार बात्रा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए नेहा फडके व सीए प्रज्ञा बंब यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिणियार यांनी आभार मानले.