शबनम न्यूज | प्रतिनिधी
बुधवार पेठेत आलेला आयटी अभियंता, मित्राचे व्हिडिओ चित्रीकरण करून रोख पैसे दिल्याची बतावणी करत खंडणी उकळणाऱ्या दोघांना नांदेड सिटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, आयुष राजू चौगुले (वय २२), सदफ पठाण (वय २१, दोघेही, रा. वाकड) अशी त्यांची नावे आहेत.
नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या माहितीनुसार, याप्रकरणी किरकिटवाडीतील ३६ वर्षीय अभियंत्याने फिर्याद दिली आहे. १३ जुलै रोजी फिर्यादी मित्रासमवेत बुधवार पेठेतील एका गल्लीत गेला होता. तेथे गाडीवर बसला असता, आरोपींनी व्हिडिओ शूट केला.
फिर्यादी परत येताना आरोपींनी घरापर्यंत पाठलाग केला. तुम्ही बुधवार पेठेत आला होतात. तेथे आमच्याकडून २० हजार रुपये घेतल्याचे सांगत ब्लॅकमेल केले. बदनामीच्या भीतीने पैसे देतील, असे आरोपींना वाटत होते. आरोपींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दोघे आमचे पैसे देत नसल्याची तक्रार केली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर अभियंत्याने आरोपी जबरदस्तीने २० हजार रुपये मागत असल्याचे सांगितले. यात गडबड असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. बुधवार पेठेत समोरच्याला ऑनलाइन पैसे द्यायचे नसल्याने २० हजार मागितले. पैसे ऑनलाइन परत करण्याऐवजी त्यांनी पळ काढल्याचेही आरोपींनी सांगितले. फिर्यादीने पैसे घेतले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यावर सत्य प्रकाशात आले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.