- पीसीयू व इतर संस्थांच्या वतीने ऑगस्ट महिन्यात जीईसीचे दुबई मध्ये आयोजन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत उत्तुंग भरारी घेतलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ व इतर संस्थांच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये दुबई मध्ये ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे (जीईसी) आयोजन करण्यात आले आहे.
दि.१६ ऑगस्ट रोजी हॉटेल कॉनरॉड, दुबई येथे महाराष्ट्राचे औद्यागिक विकास मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जीईसीचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र आणि आखाती देशातील उद्योग, व्यवसायांना चालना मिळण्यासाठी, पिंपरी चिंचवड युनिर्व्हसिटी, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, गर्जे मराठी ग्लोबल आणि सावा हेल्थकेअर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जीईसीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे.
सावा हेल्थ केअर लि.चे चेअरमन विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योग विभागाच्या सहकार्यातून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून भारत आणि आखाती देशातील उद्योजकांना एकमेकांशी संवाद साधत औद्योगिक संकल्पनांचे आदान प्रदान करता येईल. त्यातून औद्योगिक विकासाला चालना मिळेल. तसेच उद्योग क्षेत्रातील विश्व पातळीवरील धोरणे, आर्थिक नियोजन या विषयी नवउद्योजकांना ज्येष्ठ व्यावसायिकांचे मार्गदर्शन मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष आणि जीईसीचे समन्वयक सचिन ईटकर व पिंपरी चिंचवड युनिर्व्हसिटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, कॉमसेन्स टेक्नॉलॉजी चे चेअरमन सागर बाबर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पुण्यात गुरुवारी (दि. १७ जुलै) दुबई मध्ये होणाऱ्या ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. गिरीश देसाई, सचिन ईटकर, विनोद जाधव आणि सागर बाबर आदी उपस्थित होते.
उद्योजकता, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, गुंतवणुकीच्या संधी, उद्योग क्षेत्रातील भविष्यातील वाटा, नवनवीन व्यवसाय संधी, नेटवर्किंग, उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भविष्यातील आव्हाने या विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यावसायिक व उद्योजकांचा प्रेरणादायी प्रवास, त्यांच्या यशोगाथाही नवउद्योजकांना मुलाखतीद्वारे ऐकायला मिळणार आहेत. सहभागी उद्योजक हे दुबई, शारजा, अबुधाबी येथील फ्रि झोन्स, इनोव्हेशन सेंटर्स, तसेच डीपी वर्ल्ड जाफसा सेंटर येथे भेट देऊन तेथील प्रकल्पांची माहिती घेऊ शकतील.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार, संदीप वासलेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे आणि सावा हेल्थकेअर लिमिटेड चे चेअरमन विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, गर्जे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद गानू, तसेच दुबई येथील उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आयोजनासाठी कार्यरत आहेत.