spot_img
spot_img
spot_img

CRIME : ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा फायदा घेत या खाडीत अवैध हातभट्टी मद्य निर्मितीत वाढ झाली होती. त्याअनुषंगाने  उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षित जवानांनी बोटीने जावून सर्व हातभट्टी मद्य निर्मिती ठिकाणे १५ जुलै रोजी नष्ट केली. या कारवाईत एकूण ९ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा १९४९ अंतर्गत ०३ गुन्हे नोंद करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यामध्ये सामूहिक मोहिम राबवून केलेल्या कारवाईत २०० लिटर क्षमतेचे १७८ ड्रम व १००० ली. क्षमतेचे ३ बॉयलर त्यामध्ये ३३ हजार ६०० लीटर रसायन व ३५ ली. गावठी दारु, इतर हातभट्टी साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी काही मुद्देमाल नाशवंत असल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये उप अधीक्षक वैभव वैद्य, दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकाते, सहा. दुय्यम निरीक्षक रणजीत आडे, तसेच जवान संदिप धुमाळ, अविनाश जाधव, रामचंद्र पाटील, राजु राठोड, भाऊसाहेब कराड, नारायण जानकर, विनोद अहिरे, प्रविण धवणे, रुपेश खेमनार यांचा सहभाग होता.

हातभट्टी दारु, अवैध मद्य निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे विभागाची धाडसत्र मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांना अशा अवैध धंदयांबाबत तक्रार करायची असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधू शकतात, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!