spot_img
spot_img
spot_img

Agriculture : शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेंतर्गत प्रवासी कंपनी निवडीसाठी निविदा प्रसिद्ध

शबनम न्यूज | प्रतिनिधी
कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे योजना राबविण्यात येत आहे. अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करण्यासाठी ‘जेम’ अर्थात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलवर निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत निविदा सादर कराव्यात, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी साहाय्य करणे यादृष्टीने हे दौरे आयोजित करण्यात येतात. तसेच विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून मिळणार असून त्या त्या देशातील क्षेत्रीय, संबंधित संस्थांना भेटी या दौऱ्यात देण्यात येणार आहेत.
या योजनेंतर्गत युरोप दौरा १२ दिवस, इस्राईल ९ दिवस, जपान, दक्षिण कोरिया प्रत्येकी १० दिवस, चीन ८ दिवस, तसेच मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स देशासाठी १२ दिवस अभ्यासदौरे असणार आहेत. त्यांच्या आयोजनासाठी प्रवासी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेंतर्गत १८ जुलै, २०२५ रोजी निविदापूर्व सभा राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!