शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. मात्र, या चर्चा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी फेटाळून लावल्या होत्या. यानंतर मंगळावर (दि. १५) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे आदी नेते उपस्थित होते.
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की,”मला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आल्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मी महाराष्ट्रातील जनतेला ग्वाही देतो की राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी करेन. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षात अनेक जेष्ठ नेते असतानाही मला जी प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली, या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन, असं ते म्हणाले आहेत.